Maharashtra Election 2019: कल्याण पूर्वमध्ये भाजपाविरोधात शिवसेना नगरसेवकाकडून अपक्ष उमेदवाराचा प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 03:20 PM2019-10-08T15:20:54+5:302019-10-08T15:22:13+5:30
कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक 2019 - कल्याण पूर्वमध्ये 2009 आणि 2014 मध्ये अपक्ष आमदार गणपत गायकवाड आमदार म्हणून निवडून आले. मागील निवडणुकीत गणपत गायकवाड यांनी 700 मतांनी शिवसेना उमेदवार गोपाळ लांडगे यांचा पराभव केला होता.
कल्याण - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी शिवसेना-भाजपा युतीतील कुरघोडी थांबताना दिसत नाही. कल्याण पूर्वमध्येशिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारासाठी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि शिवसैनिकांनी उघडपणे युतीत बंडखोरी केलेली पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्वची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी शिवसैनिकांकडून होत होती. मात्र युती झाल्यामुळे कल्याण पूर्वची जागा भाजपाला सोडण्यात आली.
कल्याण पूर्वमध्ये 2009 आणि 2014 मध्ये अपक्ष आमदार गणपत गायकवाड आमदार म्हणून निवडून आले. मागील निवडणुकीत गणपत गायकवाड यांनी 700 मतांनी शिवसेना उमेदवार गोपाळ लांडगे यांचा पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणुकीत उभे असणारे निलेश शिंदे हे सध्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत. तसेच कल्याण पूर्वेत शिवसेनेचे 16 नगरसेवक असताना हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा अशी आग्रही भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. संतोषनगर विभागाचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली होती. मात्र युती झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधत भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे यंदा ही जागा भाजपाला सोडून याठिकाणी भाजपाने गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी भाजपाविरोधात उघड उघड बंड पुकारलं आहे.
धनंजय बोडारे हे शिवसेनेचे नगरसेवक आहे. कल्याण पूर्वमधून बोडारे यांनी निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. धनंजय बोडारे यांच्या प्रचार रॅलीत शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते. तसेच धनंजय बोडारे हे शिवसैनिक पुरस्कृत उमेदवार असल्याचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-भाजपा युतीत सगळं काही आलबेल असल्याचं सांगितले जात असलं तरी अद्यापही कल्याण तसेच अन्य भागात शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते यांची मनं जुळलेली पाहायला मिळत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्वची जागा कोणाच्या पारड्यात जाते याबाबत निवडणूक निकालानंतर कळेल.