कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसैनिकाची बंडखोरी, काँग्रेसमध्येही बंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 01:03 AM2019-10-05T01:03:59+5:302019-10-05T01:04:37+5:30
कल्याण पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला देण्याची स्थानिक शिवसैनिकांची मागणी पूर्ण न झाल्याने, भाजपविरोधात बंड पुकारण्यात आले आहे.
कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला देण्याची स्थानिक शिवसैनिकांची मागणी पूर्ण न झाल्याने, भाजपविरोधात बंड पुकारण्यात आले आहे. या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हीच परिस्थिती आघाडीतही आहे. जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते शैलेश तिवारी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गणपत गायकवाड यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि माजी महापौर रमेश जाधव उपस्थित होते. त्यावेळी शिवसैनिक नाराज नसल्याचा दावा लांडगे आणि जाधव यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात बोडारे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून, सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत बंडोबांची नाराजी दूर करण्यात शिवसेनेला यश येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बोडारे यांनी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन केले. त्याचा फटका वाहतुकीला बसला. त्यांच्या रॅलीत पूर्वेकडील आणि उल्हासनगरमधील शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रकाश तरे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे आणि अन्य कार्यकर्ते होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला असताना काँग्रेसचे शैलेश तिवारी यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार म्हणून अश्विनी धुमाळ यांनी, केडीएमसीतील बहुजन समाज पक्षाच्या नगरसेविका सोनी अहिरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
२० उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
एकूण १५ उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज दाखल केले. याआधी पाच जणांचे अर्ज दाखल असून, आता कल्याण पूर्व मतदारसंघात एकूण २० उमेदवार आहेत. शुक्रवारी भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासह शिवसेना बंडखोर धनंजय बोडारे यांच्याकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अश्विनी धुमाळ यांनी (वंचित बहुजन आघाडी), मिलिंद बेळमकर (बहुजन समाज पार्टी), प्रकाश तरे (राष्ट्रवादी काँग्रेस), उदय रसाळ (प्रहार जनशक्ती पक्ष) तर योगेश पटेल, हर्षल साळवी, सोनी अहिरे, नंदकुमार लिमकर, शैलेश तिवारी, अक्षय म्हात्रे, देवेंद्र सिंघ, अपेक्षा दळवी, नरेंद्र मोरे आदींनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत.