Maharashtra Election 2019 : शिवरायांना अभ्यासक्रमातून हद्दपार करणारे सरकार जातीयवादी- जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 03:20 PM2019-10-17T15:20:40+5:302019-10-17T15:21:49+5:30
शिवरायांचे चरित्र वाचले तर नवीन पिढी जातीयवाद उखडून फेकेल अन् या जातीयवादी सरकारला ते नको आहे.
ठाणे- शिवरायांचे चरित्र वाचले तर नवीन पिढी जातीयवाद उखडून फेकेल अन् या जातीयवादी सरकारला ते नको आहे. म्हणून या सरकारने शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमच हद्दपार करण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या जातीयवादी सरकारला आता महाराष्ट्रातील जनता हद्दपार करेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचे चरित्र हद्दपार करण्याचा डाव रचण्यात आला आहे. त्याचा आ. आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले की, एकीकडे शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करायचे; त्यांच्या नावावर मते मागायची आणि ज्या बालवयामध्ये शिवाजी महाराजांचे आचार-विचार मनावर बिंबवून या बालकांच्या मनावर शिवरायाचे संस्कार घडवायचे असतात. त्याच बालवयात शिकवल्या जाणार्या पुस्तकातूनच शिवराय हद्दपार करायचे. यामध्ये सरकारची ठरलेली नीती आहे. शिवाजी महाराज यांना खुपतात; शिवाजी महाराज यांना काट्याप्रमाणे आहेत, हे यांच्या मानसिकतेमध्ये आहे. म्हणून आंतराराष्ट्रीय उपक्रम, शैक्षणिक क्रम असे कायतरी शोधून काढले अन् चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजच गायब केले. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहेत.
आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी शिवाजी महाराज महाराष्ट्रातून हद्दपार तुम्ही करु शकत नाहीत. हद्दपार करण्याचा विचार पुस्तकाच्या माध्यमातून करणार्या या सरकारची पातळी आता महाराष्ट्राने ओळखली आहे. हे जातीयवादी सरकार आहे, शिवरायांच्या विरोधातील सरकार आहे. आणि म्हणून शिवराय यांना पुस्तकातही नकोत; कारण शिवरायांचे संस्कार झालेली पिढी जातीयवाद उखडून फेकेल, याची जाणीव असल्याने हे जातीयवादी सरकारने रचलेला कट महाराष्ट्रातील जनता उधळून लावेल.