Maharashtra Election 2019 : सुभाष भोईर की रमेश म्हात्रे? आज फैसला, कल्याण ग्रामीणमधील वाद चिघळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:24 AM2019-10-04T02:24:41+5:302019-10-04T02:25:25+5:30
कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान आ. सुभाष भोईर आणि रमेश म्हात्रे यांचे अर्ज दाखल होणार असल्याने पेच निर्माण झाला आहे.
कल्याण : कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान आ. सुभाष भोईर आणि रमेश म्हात्रे यांचे अर्ज दाखल होणार असल्याने पेच निर्माण झाला आहे. म्हात्रे हेच अधिकृत उमेदवार असल्याचे खा. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. भोईर यांना यापूर्वी दिलेले ए व बी फॉर्म रद्द करण्याची प्रक्रिया शिवसेनेने सुरू केली आहे. मात्र, भोईर हे रिंगणात राहिले, तर शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
आमदार भोईर यांना उद्धव ठाकरे यांनी ‘ए व बी’ फॉर्म दिल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरला. भोईर यांच्याऐवजी म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात यावी, असा इशारा म्हात्रे समर्थक शिवसैनिकांनी बुधवारी दिला होता. या पार्श्वभूमीवर भोईर यांच्या कार्यालयात गुरुवारी भोईर समर्थक शिवसैनिकांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रकाश म्हात्रे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भोईर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा आदेश पाळून शिवसैनिकांनी काम करायचे आहे.
म्हात्रे समर्थकांनी यापूर्वी २०१४ मध्ये असाच उमेदवारी मिळाल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली होती. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा उमेदवारी मिळत नसल्याने भोईर यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे म्हणाले की, हा शिवसेनेतील अंतर्गत वाद आहे. भोईर विरुद्ध म्हात्रे हा वादच नाही. भोईर हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. या मतदारसंघातून मी स्वत: इच्छुक होतो. परंतु भोईर यांना उमेदवारी दिल्याने मी त्यांचे काम करणार आहे.
बुधवारी रमेश म्हात्रे यांच्या समर्थक शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन केले होेते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल गुरुवारी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. भोईर यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिक जमले असतानाच सोशल मीडियावर रमेश म्हात्रे हे निवडणूक कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्जाबाबत माहिती घेऊन आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत खा. श्रीकांत शिंदे त्यांच्यासोबत असल्याचे दिसत होते. या व्हिडीओमुळे अस्वस्थता पसरली. मात्र, म्हात्रे यांच्याकडे ए व बी फॉर्म आहे किंवा कसे, याबाबत भोईर व त्यांचे समर्थक साशंकता व्यक्त करीत होते. यासंदर्भात खा. शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, कल्याण ग्रामीणचे अधिकृत उमेदवार रमेश म्हात्रे हेच आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यांना पक्षाने ‘ए व बी’ फॉर्म दिले आहे.
शिवसेनेच्या दोन उमेदवारांकडे ‘ए व बी’ फॉर्म असतील, तर यापूर्वी अर्ज दाखल करणाºया भोईर यांचा फॉर्म वैध ठरेल की, उद्या अर्ज दाखल करणाºया म्हात्रे यांचा अर्ज वैध ठरेल, याकडे खा. शिंदे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, हा तांत्रिक मुद्दा आहे. म्हात्रे हे त्यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल करणार असून त्यांचाच अर्ज वैध ठरेल.
दरम्यान, सुभाष भोईर यांनी गुरुवारी पुन्हा दुसऱ्यांदा शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी नितीन महाजन म्हणाले की, ‘ए व बी’ फॉर्म एकच असतो. त्यावर चार वेळा उमेदवारी अर्ज भरता येतो.
कुणाचा ‘ए व बी’ फॉर्म ठरणार ग्राह्य?
ज्या उमेदवाराला प्रथम ‘ए व बी’ फॉर्म दिला जातो, त्याच्या फॉर्ममध्ये एक रिक्त जागा पक्षाने ठेवलेली असते. ऐेनवेळी पक्षाला त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागल्यास पक्षाकडून नव्या उमेदवाराला ‘ए व बी’ फॉर्म देताना अगोदर उमेदवारी दिलेल्या उमेदवारास दिलेले ‘ए व बी’ फॉर्म रद्द केल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाºयास दिले जाऊ शकते.
मात्र, पक्षाने ज्याला प्रथम ‘ए व बी’ फॉर्म दिला आहे, त्याची उमेदवारी रद्द करण्याचे पत्र नव्या उमेदवाराच्या अर्जासोबत दिले नाही, तर दुसºया उमेदवाराला ‘ए व बी’ फॉर्म दिला असूनही प्रथम उमेदवारी अर्ज भरताना दिलेला ‘ए व बी’ फॉर्म हाच अधिकृत मानून त्याचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला जातो.
त्यामुळे आता म्हात्रे यांच्या शुक्रवारी दाखल होणाºया अर्जासोबत भोईर यांना दिलेले ‘ए व बी’ फॉर्म रद्द करण्याचा अर्ज शिवसेना सादर करते किंवा कसे, यावरच या मतदारसंघातून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार भोईर की म्हात्रे, हे ठरणार आहे.