Maharashtra Election 2019 : ठाणे शहर मतदारसंघ, मनसे देणार का भाजपला टक्कर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 01:09 AM2019-10-04T01:09:54+5:302019-10-04T01:11:58+5:30

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

Maharashtra Election 2019: Thane city constituency, MNS will give Challenge to BJP ? | Maharashtra Election 2019 : ठाणे शहर मतदारसंघ, मनसे देणार का भाजपला टक्कर?

Maharashtra Election 2019 : ठाणे शहर मतदारसंघ, मनसे देणार का भाजपला टक्कर?

Next

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अद्यापही या मतदारसंघात उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तर, काँग्रेसनेही हा मतदारसंघ सोडण्याची तयारी केलेली नाही. त्यामुळे या दोघांपैकी कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे असले तरी मागील विधानसभा आणि त्यापाठोपाठ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून आघाडीला फारशी मते मिळालेली नाहीत. त्यामुळे सध्या या मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे अशीच फाइट दिसत असून मनसे कितपत टक्कर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात सध्या शिवसेना व भाजपचे वर्चस्व आहे. परंतु, हा मतदारसंघ मिळावा, यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू होत्या. मात्र, या मतदारसंघाची मागणीच करण्यात आली नसल्याची माहिती उघड झाली आहे. दुसरीकडे भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात त्यांच्याच पक्षातील अनेक इच्छुकांनी आव्हान दिले आहे. मात्र, पक्षाने केळकर यांच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. दुसरीकडे मीरा-भार्इंदरच्या बदल्यात ठाणे असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे समीकरण निश्चित झाले होते. त्यानुसार, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी शब्द पाळत मीरा-भार्इंदरचा आपला उमेदवारही जाहीर केला आहे. परंतु, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराचे नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यात काँग्रेसने या मतदारसंघावरील दावा अद्यापही कायम ठेवला आहे. त्यामुळेच कदाचित उमेदवारी अद्यापही निश्चित झाली नसल्याचे बोलले जात आहे. परंतु, मनसेकडून अविनाश जाधव यांचे नाव अंतिम झाले आहे.

आता मनसे या निवडणुकीत काय चमत्कार दाखवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात ब्राह्मण, गुजराती आणि उच्चभ्रू मतदारांची संख्या जास्तीची आहे. त्यामुळे याचा फायदा हा मागील कित्येक वर्षे शिवसेना आणि भाजपच्याच उमेदवाराला झालेला दिसून आला आहे. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ५१०१० मते मिळाली होती, तर मनसेचे राजन राजे यांना ४८५६९ मते मिळाली होती. काँग्रेसच्या सुभाष कानडे यांना ३६२८८ मते मिळाली होती. तर, आघाडीशी बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाºया राष्टÑवादीच्या देवराम भोईर यांनीसुद्धा येथून १७२४४ मते मिळवली होती.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा दारुण पराभव केला होता. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना ५८२९६ मते मिळाली होती. तर, भाजपचे संजय केळकर यांना ७० हजार ८८४ मते मिळाली होती. मनसेचे निलेश चव्हाण यांना अवघी आठ हजार ३३८ मते मिळाली होती. आता ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत.

२००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये मनसेच्या मतांमध्ये तब्बल २७ टक्कयांची घट झाल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मनसेने आपला उमेदवार उभा केला नसल्याने या मतदारसंघातून किती मते मिळणार, याचा अंदाज अद्यापही मनसेलासुद्धा बांधता आलेला नाही. त्यात महापालिकेत मनसेचा एकही नगरसेवक नाही. परंतु, मागील दीड ते दोन वर्षांत मनसेच्या माध्यमातून झालेल्या विविध आंदोलनांच्या मराठी विरुद्ध गुजराथी अशा रंगलेल्या वादात मनसेने घेतलेली उडी या सर्वांचा किती फायदा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Thane city constituency, MNS will give Challenge to BJP ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.