Maharashtra Election 2019:उल्हासनगरमध्ये चुरशीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 01:30 AM2019-10-20T01:30:45+5:302019-10-20T01:31:42+5:30

Maharashtra Election 2019: शहरातील समस्यांना बगल

Maharashtra Election 2019: tough fight in Ulhasnagar election | Maharashtra Election 2019:उल्हासनगरमध्ये चुरशीची लढत

Maharashtra Election 2019:उल्हासनगरमध्ये चुरशीची लढत

Next

उल्हासनगर : मतदारसंघातील समस्यांना बगल देत, शहर विकासाच्या मुद्याला मात्र दोन्ही प्रमुख उमेदवारांनी प्रचारादरम्यान हात घातला. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, अर्धवट विकासकामे, अर्धवट कल्याण-बदलापूर रस्ता, धोकादायक इमारतींचा प्रश्न, वाहतूककोंडी आदी गंभीर समस्या निवडणूक प्रचारात कुठेही दिसल्या नाही. भाजपचे आयलानी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीही हजेरी लावली. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्या प्रचारासाठी मात्र एकही नेता फिरकला नाही. दोन्ही नेत्यांनी विकासकामांच्या आश्वासनांचा मतदारांवर अक्षरश: पाऊस पाडला आहे.

उल्हासनगर मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असून, भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत आहे. रिपाइंचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव यांनी अखेरच्या टप्प्यातील प्रचारात नॉनसिंधी मतदारांना आकर्षित करण्याचे काम सुरू केले. पक्षश्रेष्ठी तसेच मुख्यमंत्र्यांनी कलानी कुटुंबाला शब्द देऊनही कुमार आयलानी यांना उमेदवारी दिल्याने, नाराज झालेल्या कलानी कुटुंबाने विद्यमान आमदार ज्योती कलानी यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवले.

कलानी यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांचा मुलगा व ओमी टीमचा प्रमुख ओमी कलानी यांनी घेतली आहे. आयलानींच्या निवडणुकीची सूत्रे मुलगा धीरज आयलानी, गटनेते जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रकाश माखिजा, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी आदींच्या हातात आहे. रिपाइंच्या बंडखोर उमेदवाराच्या मतांचा परिणाम दोघांवर होण्याची शक्यता आहे.

कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून उल्हासनगरात मेट्रो आणण्याचे आश्वासन दिले. सिंधी समाजाला आकर्षित करण्यासाठी मेट्रो स्टेशनचे नाव सिंधुनगर ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. उत्तर भारतीय मतदारांना भाजपकडे खेचण्यासाठी भोजपुरी अभिनेता व खासदार मनोज तिवारी यांचा रंगारंग कार्यक्रम घेतला. त्यापाठोपाठ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची रॅली काढण्यात आली.

दुसरीकडे कलानी कुटुंब स्वत:च्या ताकदीवर घरोघरी जाऊन प्रचार करीत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा एकही मोठा नेता प्रचार करण्यासाठी फिरकला नाही. कलानी कुटुंबाचे शहरातील वर्चस्व वेळोवेळी सिद्ध झाले असून, मोदीलाटेतही ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

रिपाइंचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला. कुमार आयलानी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सकाळी ६ वाजता सेंच्युरी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून मतदान करण्याची विनंती कामगारांना केली. वरिष्ठ नागरिक संघ, योगा केंद्र, मैदान व उद्यानात सकाळी जाऊन मतदानाचे आवाहन आयलानी यांनी नागरिकांना केले.
ज्योती कलानी यांनीही प्रचारासाठी तेच तंत्र वापरले आहे. आयलानी व कलानी यांनी शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न, अवैध बांधकामे नियमित करणे, कल्याण ते बदलापूर रस्त्याची पुनर्बांधणी, शहर विकास आराखडा, शहर विकासासाठी शासनाकडून विशेष निधी, शहरातील जागा महापालिकेला हस्तांतरित करणे आदी विकासकामांचे आश्वासन दिले.विकास ठप्प झाल्याने

नागरिकांचे स्थलांतर

शहराचा विकास ठप्प पडल्याने, हजारो नागरिक इतर शहरांत स्थलांतरित होत आहेत. परिणामी, बहुसंख्येने असलेल्या सिंधी समाजाची लोकसंख्या मराठी भाषिकांपेक्षा कमी झाली. शहारतील राजकीय मक्तेदारीमुळे शहरावर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप रिपाइंचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव यांनी केला.

Web Title: Maharashtra Election 2019: tough fight in Ulhasnagar election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.