Maharashtra Election 2019: ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीची माघार; मनसे उमेदवाराला पाठिंबा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 02:52 PM2019-10-07T14:52:43+5:302019-10-07T14:55:53+5:30
ठाणे विधानसभा निवडणूक २०१९ - काही दिवसांपूर्वी कोथरूड मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीच्या बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न युतीकडून सुरु आहे. यात बहुतांश जागांवर शिवसेना-भाजपाला यश आलं आहे. तर पालघरमधून अमित घोडा यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं होतं पण त्यांनी माघार घेत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना होणार असल्याचं चित्र आहे तर ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुहास देसाई यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे याचा फायदा मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना होणार असल्याचं चित्र आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसे यांच्यात अधिकृत युती जाहीर झाली नसली तरी काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी एकमेकांना पुरक असलेली भूमिका घेतल्याने मनसे-राष्ट्रवादीत छुपी युती झाल्याचं पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी कोथरूड मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या भागात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवित आहे. त्यांच्याविरोधात एकाच उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत विरोधी पक्षांमध्ये एकमत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास सुर्यकांत देसाई यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा ठामपातील गटनेते नजीब मुल्ला यांनी दिली आहे. दरम्यान, आपण पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षहीत पाहून हा निर्णय घेतलेला असल्याने आपण आपला निवडणूक अर्ज मागे घेत असल्याचे सुहास देसाई यांनी स्पष्ट केले.
तर ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार मागे घेतल्याने याठिकाणी मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपाचे संजय केळकर यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. त्यात विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फूट पडू नये अशी काळजी मनसे-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.