मतदान शांततेत; अंदाजे ४२ टक्के मतदान, कुठेही अनुचित घटना नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 02:34 AM2019-10-22T02:34:18+5:302019-10-22T02:34:30+5:30
Maharashtra Election 2019: डोंबिवली मतदारसंघासाठी ३२३ मतदानकेंद्रांवर सोमवारी कुठेही गालबोट न लागता शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली.
डोंबिवली : डोंबिवली मतदारसंघासाठी ३२३ मतदानकेंद्रांवर सोमवारी कुठेही गालबोट न लागता शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांचा ओघ कमी होता. त्यात दुपारी काही प्रमाणात वाढ झाली, तरी मतदारांचा निरुत्साह स्पष्ट दिसत होता. दिवसभरात केवळ अंदाजे ४२ टक्के मतदान झाले. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानात घट झाल्याचे दिसत आहे.
कुठेही मतदानप्रक्रियेला गालबोट न लागता मतदान झाले. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था तंतोतंत पाळली गेल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार म्हणाले. या मतदारसंघात एकूण तीन लाख ५१ हजार ५२६ मतदार होते. त्यामध्ये एक लाख ८१ हजार ६८१ पुरुष, एक लाख ६९ हजार ८४५ महिला मतदारांचा समावेश होता.
ठाकुर्ली येथील महिला समिती शाळेतील मतदानकेंद्रांवरील एका ईव्हीएम मशीनच्या बॅटरीत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे ही यंत्रे बदलण्यात आली. अन्य दोन ठिकाणीही यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पवार म्हणाले. तसेच, १४ ठिकाणच्या व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. बोगस मतदानाचीही कुठेही तक्रार आली नसल्याचेही पवार म्हणाले.
या मतदारसंघामध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण, मनसेचे मंदार हळबे, काँग्रेसच्या राधिका गुप्ते, बसपाचे दामोदर काकडे, संभाजी ब्रिगेड पार्टीचे डॉ. अमितकुमार गोईलकर आणि अपक्ष भागवत गायकवाड या उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतदानयंत्रात बंद झाले. भाजप विरुद्ध मनसे अशी लढत असली, तरी काँग्रेसने महिला उमेदवार दिल्याने त्या किती मते घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत संथगतीने मतदान झाले. त्यानंतर, दुपारी ३ ते सायंकाळी ६ यादरम्यान मतदानाला वेग आला. ठिकठिकाणच्या केंद्रांवर मतदारांची पुन्हा गर्दी झाली होती. सकाळी पावसाचे सावट होते, मात्र ९ वाजल्यानंतर आकाश निरभ्र झाल्याने उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दिव्यांगांसाठी आठ रिक्षांची सुविधा करण्यात आली होती. केंद्रांवर ज्येष्ठांना विशेष सुविधा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. प्रचारात शहरातील खड्डे, अस्वच्छता आदी मुद्दे गाजले.
उमेदवारांनी केले सहकुटुंब मतदान
रवींद्र चव्हाण, मंदार हळबे, राधिका गुप्ते यांच्यासह सगळ्याच उमेदवारांनी त्यांच्या कुटुंबीयांसह सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. पश्चिमेला कानाकोपऱ्यांमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह असल्याचे दिसून आले.
ज्येष्ठ नागरिक जखमी
भालचंद्र नाटेकर (७८) या ज्येष्ठ नागरिक मतदाराला भोवळ आली आणि त्यांचा तोल जाऊन ते टिळकनगर येथील मतदानकेंद्रात मतदानाला जात असताना पायऱ्यांवरून खाली पडले. हे पाहताच पोलिसांनी धाव घेत त्यांच्यावर प्रथमोपचार करून मतदानकेंद्राजवळ नेले. त्यांच्या डोक्याला, कोपराला खरचटले असून मलमपट्टी करण्यात आली आहे. मतदान करून ते घरी गेले.