Maharashtra Government: राज्याच्या राजकारणात ठाणे केंद्रस्थानी, सेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईकांवर जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 01:39 AM2019-11-25T01:39:59+5:302019-11-25T01:40:55+5:30
सत्तास्थापनेसाठी शनिवारी राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांभोवती प्रत्येक पक्षाने संरक्षक कठडे उभारले आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : सत्तास्थापनेसाठी शनिवारी राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांभोवती प्रत्येक पक्षाने संरक्षक कठडे उभारले आहे. मुंबईतील खासगी हॉटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना ठेवले असून, शिवसेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील शिवसेनेच्या आमदारांची, तर राष्ट्रवादीच्या आमदारांची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविली आहे. विशेष म्हणजे भाजपनेही माजी पालकमंत्री गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षातील आमदारांची जबाबदारी सोपविल्याने ठाणे जिल्हा सतेच्या केंद्रस्थानी असल्याचे चित्र दिसत आहे.
शिवसेनेने याआधीच माजी पालकमंत्री तथा कोपरी-पाचपाखाडीतील शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रवादीने सोडला, तर शिंदे यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील सत्ता समीकरणात शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवण्याची, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये फुटू नयेत, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी शिंदे यांच्याकडेच आहे. शिंदे यांची संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकहाती पकड आहे. जिल्ह्यात कल्याण ग्रामीण आणि शहापूर या दोन जागा वगळता शिवसेनेने लढवलेल्या सर्व पाच जागा जिंकल्या आहेत. ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांची महापौरपदी बिनविरोध निवड होण्यात आणि उल्हासनगरातही सत्तांतर घडवून महापौरपदी लीलाबाई अशान या विराजमान होण्यात शिंदे यांचेच डावपेच यशस्वी ठरले. याशिवाय, अहमदनगरसारख्या ठिकाणीही शिंदेशाहीची नीती यशस्वी ठरल्याने ते ठाकरे कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे मानले जातात. याच पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये शिंदे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची साथ सोडून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी फडणवीस यांच्या जोडीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण, अशाही स्थितीत मोठ्या साहेबांची साथ न सोडणाऱ्या जयंत पाटील यांच्यासह ठाण्यातील कळवा, मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचेही नाव घेतले जाते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासूनच आव्हाड हे त्यांच्याबरोबर आहेत. म्हणूनच पक्षाचे आमदार एकजुटीने राहावेत, याची खबरदारी घेण्यापासून अनेक महत्त्वाच्या जबाबदाºया ते सांभाळताना दिसत आहेत.
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे ८, शिवसेनेचे ५, राष्ट्रवादीचे दोन, तर मनसे, सपा आणि अपक्ष मिळून प्रत्येकी एक आमदार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास ठाण्यातील शिलेदारांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक मुख्य भूमिकेत
विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात दोन जागा अतिरिक्त घेऊन आठ जागा जिंकल्यामुळे भाजपची सरशी झाली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतून जिल्हाभर भाजपची मोट सांभाळणारे रवींद्र चव्हाण तसेच निवडणुकीच्या तोंडावर राष्टÑवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईकांवरही भाजप नेतृत्वाने आपल्या आमदारांची जबाबदारी सोपविली आहे. आपले आमदार फुटू नये, कोणतीही दगाबाजी होऊ नये, यासाठी शिवसेना राष्टÑवादीप्रमाणेच भाजपचेही चव्हाण आणि नाईक हे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील आमदारांवर लक्ष ठेवून आहेत.