Maharashtra Lockdown : पालघरमध्ये १, २०४ जणांवर कारवाई, जिल्ह्यात तपासणी मोहीम, पाच लाख ३९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 11:13 PM2021-04-15T23:13:36+5:302021-04-15T23:14:06+5:30
Maharashtra Lockdown: संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मनाई आदेश लागू केले आहेत.
पालघर : जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांतर्गत मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी १ हजार २०४ इसमांविरोधात कारवाई करून ५ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गुरुवारपासून जिल्ह्यात संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपास पथकाकडून कडक तपासणी मोहीम राबवली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मनाई आदेश लागू केले आहेत. पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या आदेशान्वये सातपाटी, पालघर, केळवे आदी १६ पोलीस ठाण्यांतर्गत ३ लग्न आणि हळदी समारंभ, १० रिसॉर्ट मालक, ७६ दुकानदार, १ क्रिकेट स्पर्धा, २ बिअर शॉप व ६४ इतर गुन्ह्यांबाबत १५६ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ५ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात यश मिळविले.
सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर धायाळकर यांनी एक रिसॉर्ट मालक, तसेच १२ जणांविराधात जमावबंदीचे उल्लंघन करणे, विनामास्क फिरणारे १०८ नागरिक आणि शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ गुन्हे दाखल करून कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. पालघरमध्ये गुरुवारपासून संचारबंदी नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
अधिकाऱ्यांचे लक्ष
जिल्ह्यात गुरुवारपासून संचारबंदी नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांनी रस्त्यात बॅरिकेट्स उभारून विनाकामाचे बाहेर पडणाऱ्यांविरोधात कडक कारवाईला सुरुवात केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईला सुरुवात केल्याचे पाहावयास मिळाले.