Maharashtra Lockdown : जव्हारमध्ये संचारबंदीसह लॉकडाऊनला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:28 PM2021-04-15T23:28:53+5:302021-04-15T23:29:58+5:30
Maharashtra Lockdown : कोरोनाचा वाढता फैलाव व वाढत चाललेले मृत्यूचे आकडे यामुळे सध्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
जव्हार : जव्हार तालुक्यात व शहरात संचारबंदीसह लॉकडाऊनला योग्य प्रतिसाद मिळाला. जीवनावश्यक वस्तू खरेदी, दवाखाने, औषधे खरेदीसाठी नागरिक काही प्रमाणात सकाळ ते दुपारपर्यंत रस्त्यावर दिसत होते, मात्र दुपारनंतर तर संपूर्ण रस्ते सुनसान
झाले होते.
कोरोनाचा वाढता फैलाव व वाढत चाललेले मृत्यूचे आकडे यामुळे सध्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच खेडोपाड्यात ग्रामपंचायतींनी हद्दीतून बाहेर जाण्यास व येण्यास मज्जाव केल्यामुळे नागरिकांची रेलचेल कमी झाली आहे. जव्हारमध्ये बुधवारी ६३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ७४९ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जव्हारमध्ये आयटीआय सीसीसी सेंटर असून यात १२५ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ज्यांची प्रकृती बिकट आहे, अशांना विक्रमगड येथील रिव्हेरा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दंडुक्याची दहशत
जव्हार तालुक्यामध्ये गळ्यात आयकार्डसह शासकीय कर्मचारी तथा आरोग्य सेवा देणारे कर्मचारी यांची वाहने रस्त्यावर फिरताना दिसत होती. शहराच्या चारही नाक्यांवर पोलीस तैनात करण्यात आलेले होते. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांमध्ये पोलिसांच्या दंडुक्याची दहशत पसरलेली दिसत होती.