कपिल पाटलांकरिता केवळ ‘किसन’ आला धावून
By नितीन पंडित | Published: June 6, 2024 01:11 PM2024-06-06T13:11:00+5:302024-06-06T13:11:18+5:30
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: अन्य आमदारांची पुरेशी साथ न मिळाल्याने पाटील यांचा पराभव
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपमधील त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याच विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक साथ मिळाली.
भिवंडी (प), कल्याण (प.) शहापूर अशा भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघात पाटील यांच्यापेक्षा भिवंडी मतदारसंघातील विजयी उमेदवार सुरेश म्हात्रे तथा बाळ्यामामा किंवा अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांना अधिक मते मिळाली. महायुतीमधील कथोरे वगळता अन्य आमदारांची पुरेशी न मिळालेली साथ व सांबरे यांनी भरभरून घेतलेली मते यामुळे पाटील यांचा पराभव झाला.
भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम, शहापूर व मुरबाड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. पक्षीय बलाबल पहिले तर या लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद अधिक आहे. त्यामुळे कपिल पाटलांचा विजय निश्चित होता. मात्र पाटलांचा पराभव झाला.
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिंदे गटाचे शांताराम मोरे आमदार असून या ठिकाणी उद्धवसेनेमुळे बाळ्या मामा यांना फायदा झाला. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांना ६२ हजार ८५७ मते मिळाली. त्याचा फटका पाटलांना बसला आहे.भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादीचे रईस शेख आमदार असून येथे मुस्लिमबहुल मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने मुस्लिम समाजाने एकतर्फी बाळ्या मामा यांना मतदान केले. बाळ्या मामा यांना १ लाख ८ हजार ११३ मते मिळाली तर कपिल पाटलांना अवघी ४५ हजार ३७२ मते मिळाली.
भिवंडी पश्चिम मतदारसंघात भाजपचे महेश चौघुले हे आमदार आहेत. चौघुले यांनीदेखील कपिल पाटील यांना हवी तशी मदत केली नसल्याचे निकालावरून दिसते. या मतदारसंघात पाटील यांना अवघी ४७ हजार ८७८ मते मिळाली तर बाळ्या मामा यांना १ लाख ८ हजार ३५८ मते मिळाली. कल्याण पश्चिम मतदारसंघात पाटील यांना १ लाख ५ हजार ३६५ मते मिळाली तर अपक्ष नीलेश सांबरे यांना येथून १ लाख ९१ हजार ८७ मते मिळाली. बाळ्या मामा यांना येथून ७४ हजार १२९ मते मिळाली. शहापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दौलत दरोडा आमदार असून, येथून पाटील यांना अवघी ४३ हजार ५२१ मते मिळाली. बाळ्या मामा यांना ५४ हजार ७०१ मते मिळाली.
कोणत्या आमदाराच्या मतदार संघात कोणाला मिळाली किती मते
विधानसभा आमदार सुरेश म्हात्रे कपिल पाटील
भिवंडी पूर्व रईस शेख (सपा) १०८११३ ४५३७२
भिवंडी पश्चिम महेश चौघुले (भाजप) १०८३५८ ४७८७८
भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे (शिंदे गट) ७५३३० ८३४०२
कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर (शिंदे गट) ७४१२९ १०५३६५
शहापूर दौलत दरोडा (अजित पवार गट) ५४७०१ ४३५२१
मुरबाड किसन कथोरे (भाजप) ७७५६८ १०६३६९