महाराष्ट्र पुरुष प्रथम आणि महिला तृतीय क्रमांकाचे मानकरी, दुसरी वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धा
By सचिन सागरे | Published: March 18, 2023 05:34 PM2023-03-18T17:34:02+5:302023-03-18T17:34:36+5:30
Kalyan News: स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जयपूर स्मॅश रॅकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धा नुकत्याच जयपूर येथे संपन्न झाल्या.
- सचिन सागरे
कल्याण : स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जयपूर स्मॅश रॅकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धा नुकत्याच जयपूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र स्मॅश रॅकेट असोसिएशन अंतर्गत महाराष्ट्र पुरुष संघाने प्रथम तर महिला संघाने तृतीय स्थान प्राप्त केले. महाराष्ट्र संघाने पुरुष आणि महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही विजेतेपद प्राप्त केले.
महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी विकास जायभाये तर महिला संघाच्या कर्णधारपदी निशा चिकणे यांनी संघाचे नेतृत्व केले. तर मुंबई पुरुष संघाचे नेतृत्व तबरेज सय्यद यांनी केले. स्पर्धेचे स्टार प्लेयर ऑफ द इयर म्हणून महाराष्ट्राचे असद शेख, अदनान शेख, साक्षी रोकडे यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राकडून स्पर्धेत पंच म्हणुन आमीर शेख यांनी कामकाज पाहिले.
महाराष्ट्र पुरुष संघात असद शेख, अदनान शेख, तानाजी कदम, अय्युब जागिरदार, अविनाश पाटील, विकास जायभाये, फैजान शेख, अरशद शेख महिला संघात निशा चिकणे, अश्विनी माळकार, शिवानी फड, आरती बाकळे, रोहिणी सुर्यवंशी, सिद्धेश्वरी जाधव, साक्षी रोकडे यांचा समावेश होता तर मुंबई पुरुष संघात तबरेज सय्यद, रितेश पेटकर, मिरान शिरवळकर, नय्युम शेख, रोहित गंडले, सोमनाथ राऊत, दिनेश वाघे, यशवंत मुकणे यांचा समावेश होता.
नव्याने सुरू झालेल्या स्मॅश रॅकेट खेळाला सध्या कोणत्याही शासकीय सुविधा, अनुदान नसल्याने राज्य संघटनेने खेळाडूंना अवगत केले होते. तरीही सर्व खेळाडूंनी खेळाबद्दल असलेल्या आवडीमुळे स्वेच्छेने सहभाग नोंदवत हे यश संपादन केले. यासाठी महाराष्ट्र स्मॅश रॅकेट असोसिएशनचे सचिव असद शेख यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.