महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ७६ तरुणांची जम्बो कार्यकारणी जाहीर
By अजित मांडके | Published: January 5, 2023 06:05 PM2023-01-05T18:05:54+5:302023-01-05T18:07:33+5:30
शिवसेना, भाजप पाठोपाठ मनसेने देखील ठाण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे.
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची नवीन जम्बो कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. यात तरुण फळी उभी करण्यात आली असून प्रत्येकाच्या खांद्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत आणि मतदानात तरुणांचा वाढता टक्का लक्षात घेत मनसेने देखील यावर अधिक भर दिल्याचे दिसत आहे.
शिवसेना, भाजप पाठोपाठ मनसेने देखील ठाण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्यामुळेच मागील काही महिन्यात मनसेने ठाण्यात पुन्हा आपली ताकद वाढविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यातही शिवसेना दोन गटात विभागली गेल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी देखील मनसेने व्युव्हरचना आखली आहे. त्यानुसार ज्या ज्या भागात मनसे कमी होती, त्या त्या ठिकाणी मनसेने लक्ष घालून मनसेची नवी फळी निर्माण केली आहे.
दरम्यान आता मागील काही निवडणुकांचा विचार केल्यास प्रत्येक निवडणुकीत तरुण मतदारांचा ओढा हा मतदान करण्याकडे अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा मतदारांना आर्कषित करण्यासाठी प्रमुख पक्षांनी मोर्चे बांधणी केली आहे. आता त्यात मनसे कशी पाठी राहणार, त्यांनी देखील तरुण मतदारांना आपलेसे करण्यासाठी पक्षातच तरुणांची फळी उभी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ठाण्यातील विविध पदाधिका:यांच्या नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रसाठी ठाणो शहर सचिव पदी दिपक शिंदे, उपशहर अध्यक्ष संकेत देवे, विभाग अध्यक्ष महेश घाडगे, विभाग सचिव अनिकेत शिंगोटे, उपविभाग अध्यक्ष निखील कान्हेरे आदींसह कोपरी पाचपाखाडी, वागळे प्रभाग समिती, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती, ठाणो शहर, माजिवडा - मानपाडा, उथळसर, वर्तकनगर आदींसह इतर प्रभागात विविध तरुण तरुणींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात उपविभाग अध्यक्ष - २४, उपविभाग सचिव - ३३, शहर सचिव - २ आदींसह इतर महत्वाच्या नियुक्त्या धरुन तब्बल ७६ जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.