महापौर कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 05:40 AM2020-02-11T05:40:16+5:302020-02-11T05:40:45+5:30
ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्र पोलीस संघ, तर महिला गटात ठाणे महापालिकेच्या संघांनी विजेतेपद पटकाविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्र पोलीस संघ, तर महिला गटात ठाणे महापालिकेच्या संघांनी विजेतेपद पटकाविले. महापालिकेच्या वतीने रविवारी विजेत्या पुरुष व महिला संघांना प्रत्येकी एक लाख रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले गेले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी उपस्थित होते.
पुरुष गटात एअर इंडिया द्वितीय
व्यावसायिक पुरुष संघात द्वितीय पारितोषिक एअर इंडियाने पटकाविले असून त्यांना रोख रक्क्म ७५ हजार रुपये, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. उपउपान्त्यपद महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, भारत पेट्रोलियमने पटकाविले असून त्यांना रोख रककम ३० हजार, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. एअर इंडिया संघातील उमेश म्हात्रे यांनी उत्कृष्ट खेळाडू, महाराष्ट्र पोलीस संघातील बाजीराव घोडके यांनी उत्कृष्ट पकड, तर उदयोन्मुख खेळाडू किताब ठाणे पालिका संघातील अक्षय भोईर, तर मालिकावीरमधील उत्कृष्ट खेळाडूची रोख रक्कम २१ हजाराचे पारितोषिक महाराष्ट्र पोलीस संघाच्या नितीन थळेनी पटकाविली.
महिला गटात बँक आॅफ बडोदा महिला व्यावसायिक गटात द्वितीय पारितोषिक बँक आॅफ बडोदा यांनी पटकाविले असून त्यांना रोख रक्कम ७५ हजार, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उपउपान्त्यपद एमरल्ड द इन्फ्रास्ट्रक्चर व बालवडकर पाटील व्हेंचर्स यांनी पटकाविले असून त्यांना रोख रककम ३० हजार, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक बँक आॅफ बडोदाच्या साक्षी रहाटे, उदयोन्मुख खेळाडूचा किताब लेयर टेक्नॉलॉजी संघातील ज्योती पवार यांनी, तर उत्कृष्ट खेळाडूची रोख रक्कम २१ हजाराचे पारितोषिक ठाणे पालिका संघातील कोमल देवकरने पटकाविले.
ठाणे पालिकेच्या महिला संघाने प्रथमच स्पर्धेत सहभागी होत विजेतेपद पटकावल्याने या संघाला महापौर नरेश म्हस्के यांनी २५ हजारांचे, उपमहापौर पल्लवी कदम यांनी ११ हजारांचे तर सभागृह नेते अशोक वैती व शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांनी संयुक्तरीत्या २१ हजारांचे विशेष पारितोषिक देऊन सन्मानित केले.
मुंबईतही थरार
ठाणे पालिकेने नियोजनपूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांचे कौतुक करून अशा प्रकारची स्पर्धा मुंबईतदेखील आयोजित करणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले.