Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 04:44 PM2024-11-27T16:44:36+5:302024-11-27T17:00:21+5:30
Maharashtra Politics : गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार याची सुरु चर्चा आहे.
Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. आता महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या चर्चा आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
गेल्या काही दिवसापासून महायुतीचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार या चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनीही पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मुख्यमंत्रिपदासाठी दोन दिवसात दिल्लीत बैठका झाल्याचे बोलले जात आहे. भाजप मुख्यमंत्रीपद पक्षाकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केले. महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाईड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
मोदी-शाह म्हणतील तसं!
"बाळासाहेब ठाकरे यांची सर्वसामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा होती, ती इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला मान्य असेल. काल पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना फोन केला होता. त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय होईल, त्यामध्ये माझा कोणताही अडसर नसेल. भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.