विशेष लेख: तामिळनाडूच्या वळणावर राजकारण

By संदीप प्रधान | Published: December 26, 2022 09:23 AM2022-12-26T09:23:41+5:302022-12-26T09:25:37+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील असून, त्यांचा व त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्ष गेल्या काही महिन्यांत तीव्र झालाय. 

maharashtra politics at a way of tamil nadu | विशेष लेख: तामिळनाडूच्या वळणावर राजकारण

विशेष लेख: तामिळनाडूच्या वळणावर राजकारण

googlenewsNext

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना ३० जून २००१ च्या मध्यरात्री दीड वाजता गाढ झोपेतून पोलिसांनी उठवलं व अक्षरश: फरपटत पोलिसांच्या गाडीत कोंबून अटक करून नेले. १२ कोटी रुपयांच्या उड्डाणपूल घोटाळ्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी ही कारवाई केली होती. ठाण्याचे राजकारण तामिळनाडूच्या वळणावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील असून, त्यांचा व त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्ष गेल्या काही महिन्यांत तीव्र झालाय. 

नागपूर सुधार प्रन्यासच्या १६ भूखंडधारकांना त्यांचे भूखंड नियमित करून देण्याच्या शिंदे यांनी ८ जूनला मविआ सरकारच्या काळात नगरविकास मंत्री या नात्याने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाने आक्षेप घेतला. त्यामुळे विरोधकांना थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली. या प्रकरणात ज्यांनी याचिका केल्या होत्या, त्यांची नागपूरमध्ये आव्हाड यांनी भेट घेतल्याचे समजते. त्यानंतर विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले. 

काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाचा खेळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला, तेव्हा आव्हाड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले गेले. त्यातून ते जामिनावर सुटतात न सुटतात तोच भाजपच्या एका कार्यकर्तीने त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आपल्यावर पाच गुन्हे दाखल करून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यातून तडीपार करण्याचे कटकारस्थान सत्ताधारी पक्ष करीत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. त्यामुळे शिंदे यांच्या विरोधातील प्रकरण हाती लागताच हिशोब चुकता करण्याची संधी प्राप्त झाली, असा आनंद कदाचित त्यांना झाला असू शकतो.

महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडले व त्यांना पदे सोडावी लागली. बॅ. अंतुले हे सिमेंट घोटाळ्यामुळे संकटात सापडले. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी हे त्यांच्या जावयाच्या पुण्यातील बेकायदा टॉवरमुळे अडचणीत आले होते. मुळात शिंदे यांचा हा कथित घोटाळा मविआ सरकारमधील असून, त्यावेळी उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड हे त्यांचे सहकारी होते. 

सरकार चालवणे ही जर सामूहिक जबाबदारी असेल, तर मविआ सरकारच्या काळात झालेल्या चुकीच्या निर्णयात ठाकरे, आव्हाड हेही वाटेकरी आहेत. उलटपक्षी भाजपच्या नेत्यांनी मविआ सरकारवर या निर्णयामुळे टीका केली होती. सरकार बदलल्यावर किंवा व्यक्तींनी पक्ष अथवा आघाड्या बदलल्यावर निर्णयाची जबाबदारी झटकता येत नाही.

सरकारचे घर असते काचेचे

सरकारचे घर हे काचेचे असते व मुख्यमंत्र्यांचे घर तर कचकड्याचे असते. त्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न विरोधक करतात. शिंदे यांना अडचणीत आणण्याचे काम त्यांचे जुने सहकारी करीत आहेत की नवे? हेही त्यांनी तपासून घेतले पाहिजे. शिंदे याचे ठाण्यातील स्थानिक प्रतिस्पर्धी नेते जसे अस्वस्थ आहेत तसेच इतका मोठा राजकीय धमाका करणाऱ्या शिंदे यांना ताब्यात ठेवणे व त्यांचे परतीचे सर्व मार्ग बंद करणे, ही त्यांच्या नव्या मित्रांचीही गरज आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: maharashtra politics at a way of tamil nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.