कोणता झेंडा घेऊ हाती...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 01:36 AM2020-01-19T01:36:08+5:302020-01-19T01:37:26+5:30
शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यावर मनसेबरोबर भाजपचा सूर जुळेल का? या व अशा अनेक मुद्द्यांबाबत दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते व सर्वसामान्यांना काय वाटते त्याचा आढावा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येत्या गुरुवारी, २३ जानेवारी रोजी पक्षाचा पहिला महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवी दिशा देण्याचे सूतोवाच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या झेंड्यातील भगवा रंग नजरेत भरणारा असून महामेळाव्याकरिता लावलेली पोस्टर्स राज यांच्या नव्या महाराष्ट्र धर्माचे संकेत देत आहेत. राज यांनी हिंदुत्वाची भूमिका घ्यावी का? लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप व मनसे यांनी परस्परांवर बरीच चिखलफेक केल्यावर आता शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यावर मनसेबरोबर भाजपचा सूर जुळेल का? या व अशा अनेक मुद्द्यांबाबत दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते व सर्वसामान्यांना काय वाटते त्याचा आढावा.
भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या जरी सुरु असल्या तरी माझ्या मते हे पक्ष सध्या तरी एकत्र येऊ शकत नाही. भाजप सध्या विरोधी बाकावर आहे. त्यातच मनसेने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे महाआघाडी सरकारमध्ये मनसेला निश्चितच सन्मान आहे. राजकीयदृष्ट्या मनसेने आतापर्यंत सेक्युलर भूमिकाच घेतली आहे. त्यामुळे कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा सध्या तरी मनसे पुढे करणार नाही, असे मला वाटते.
- अरु ण मारु ती पंडित, भिवंडी
भाजप व मनसे एकत्र आल्यास भाजपला जास्त तर राज ठाकरे यांच्या मनसेला कमी फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपची हिंदुत्वाची भूमिका देशात सर्वस्तरांतील लोकांना माहीत आहे. मात्र, मनसेची नवीन भूमिका सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज यांना पुन्हा नव्या शक्तीने मैदानात उतरावे लागेल. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान राज यांनी केलेली भाषणे त्यांच्या युतीत बाधा आणतील. शिवाय, मनसेने हिंदुत्व स्वीकारले तर पक्ष स्थापनेपासून सोबत असलेले अल्पसंख्याक, बहुजन वर्ग व दलित मतदार दूर जाणार आहेत. म्हणजे मनसेची स्थिती महाभारतातील अभिमन्यूसारखी होईल. - नर्गिस खान, उल्हासनगर
मुळात भाजपची हिंदुत्वाची भूमिका ठाम राहिलेली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये कट्टरपंथी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत
सरकार बनवण्यासाठी भाजपने केलेली युती विचारात घेतली तर भाजप स्वत:च आपण कट्टर हिंदूंचा पक्ष असल्याचे सांगू शकत नाही. मनसेने स्वत:ची महाराष्ट्र व मराठी माणसांच्या हिताचा पक्ष म्हणून निर्माण केलेली ओळख त्यांना प्रत्यक्ष कार्यातून टिकवता आलेली नाही. मनसेकडून अपेक्षाभंग झाल्याने नागरिकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे मनसे भाजपसोबत
गेली वा त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली तरी फारसा उपयोग होणार नाही. राज ठाकरे यांनी निवडणुकांमध्ये भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे सभांमधून जे वाभाडे काढले, त्यामुळे भाजप-मनसे युतीची कल्पना नागरिकांच्या मनाला पटणार नाही. - हर्षाली अपराध, भार्इंदर
मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. मात्र ते एकत्र येतील असे वाटत नाही. मनसेने आधी मराठीचा मुद्दा घेतला आहे. आता हिंदुत्वाची भूमिका घ्यायला काही हरकत नाही. पण त्यांनी यापूर्वी हिंदुस्थानातील मुस्लिम चालणार असल्याची भूमिका घेतली होती. आता त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यास त्यांच्या अगोदरच्या भूमिकेला तडा जाईल. सर्वसामान्यांना या युती-आघाडीचे काही पडलेले नाही. केवळ राजकीय पक्ष राजकारण करीत आहेत. - प्रवीण दुधे, डोंबिवली
सध्याची राजकीय स्थिती बघता लोकप्रिय असूनदेखील मनसेला हव्या तितक्या जागा विधानसभेत मिळवता आल्या नाहीत. परंतु, राज ठाकरे यांची असलेली भूमिका तसेच आंदोलने हे लक्ष वेधणारे आहेत. तरुणवर्गाचा कल मनसेकडे आहे. त्यांच्या भाषणाला होणाऱ्या तुफान गर्दीचे रूपांतर मतांत का होत नाही? आता सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना तसेच भाजप यांचा काडीमोड झाल्यानंतर आणि राज ठाकरे यांनी निवडणुकीमध्ये टीका केल्यानंतर मनसे पुन्हा भाजपसोबत गेल्यास महाराष्ट्रातल्या तमाम तरुणवर्गाचा भ्रमनिरास होईल. आता येत्या २३ जानेवारीला राज ठाकरे हिंदुत्व अंगीकारणार आहेत. पण अजून तशी भूमिका स्पष्ट नाही. झेंड्यात करण्यात येणारा बदल याकडे जास्त लक्ष न देता, पक्षवाढीकरिता ते काय करतात, हे पाहणे महत्त्वाचे राहील. मतदारवर्ग मनसेकडे कसा आकर्षित होईल, याकडे राज यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तरच भविष्यात मनसेला फायदा होईल.
- मीना रमेश घाटेसाव, कल्याण
मनसे हा पक्ष सध्या राजकीय झुंज देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पक्षातील बडे नेते पक्षाला रामराम ठोकताना दिसले. ‘आंदोलने’ आणि ‘खळ्ळखट्याक’ची भाषा करणारी मनसे आता पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसून येत नाही. सभांना होणारी गर्दी ही केवळ फोटोपुरती मर्यादित आहे. विधानसभा निवडणुकीत कसाबसा भोपळा फोडता आला आणि एकमेव आमदार निवडून आला. म्हणावं तसं यश अजूनपर्यंत मनसेला मिळवता आले नाही. २००९ च्या निवडणुकीपूर्वी अटकसत्र, परप्रांतीय तरुणांना रेल्वेभरती परीक्षेवेळी केलेली मारहाण, अशा काही आंदोलनामुळे राज ठाकरे यांना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर राहावे लागले होते. त्यावेळी मनसेने चांगला जोर धरला होता. तरुणवर्ग आकर्षित झाला होता. आता निवडणुकांमध्ये केलेली मोदी आणि शहांविरोधातील जहरी टीका बघता चर्चा जरी सुरू झाली असली तरी हे दोन्ही पक्ष एकत्र येणे शक्य नाही. राज ठाकरे यांचे एकूण व्यक्तिमत्त्व बघता ते अगदी बाळासाहेबांसारखे आहेत. त्यामुळे ते नक्कीच स्वबळावर उंच भरारी घेतील, यात शंका नाही. राज यांनी हिंदुत्वाची भूमिका घ्यावी. त्यामुळे बाळासाहेबांसारखे नेतृत्व महाराष्ट्राला बघायला मिळेल, अशी तरुणवर्गाला आशा आहे.
- दर्शन रामदास कळसे, कल्याण
कोणी कोणाबरोबर एकत्र यावे, याचे सध्या काहीच तारतम्य राहिलेले नाही. सत्तेसाठी राजकारणी एकत्र येतात आणि त्याला ‘जनहितार्थ’ असे गोंडस नाव देऊन मोकळे होतात. आता मनसे आणि भाजप एकत्र येऊन यापेक्षा काही वेगळे करणार आहेत असे नाही, सत्तेसाठीच तेही एकत्र येत आहेत. राहिला प्रश्न हिंदुत्वाचा ? तर मुळात हिंदुत्वाचे कोणालाच घेणेदेणे नसते. सत्तेवर येण्यासाठी सोयीस्करपणे या मुद्द्यांचा वापर केला जातो. मनसेने याअगोदर बºयाच प्रकरणांमध्ये आपल्या भूमिका बदलल्या आहेत. मनसेच्या धरसोड भूमिकेमुळे सध्यातरी सर्वसामान्यांचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे मनसेने हिंदुत्वाची काय कोणतीही भूमिका घेतली तरी त्यावर सर्वसामान्य मतदार विश्वास ठेवतीलच असे मुळीच नाही.
- कल्पेश बालघरे, ठाणे
हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मनसे आणि भाजप एकत्र येण्यामुळे मनसेचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना आणि भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा वारंवार घेऊन तो गुळगुळीत केला आहे. सत्तेमुळे शिवसेनेला हिंदुत्वाचा मुद्दा घेता येत नाही. तशीच परिस्थिती भाजपचीही आहे. अनेकदा भाजपला हा मुद्दा घेऊन फार काही सिद्ध करता आलेले नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोघांनाही हा मुद्दा नुकसानकारक आहे. याउलट, मनसेला मात्र हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यास चांगला वाव आहे. मनसेने केवळ महाराष्टÑात मर्यादित न राहता, देशभरात हिंदुत्वाच्या मुद्द्याचा प्रचार आणि प्रसार करता येईल. यातूनच मनसेला स्वत:च्याही प्रचाराची संधी मिळेल.
- अश्विनी वर्पे, ठाणे
मनसेने मराठी व महाराष्ट्र हिताच्या भूमिकेवरच ठाम राहिले पाहिजे. त्यांनी तळागाळापर्यंत आपले कार्य पोहोचवले पाहिजे. दुर्दैवाने ते झाले नाही. नागरिकांपर्यंत मनसेचे कार्य, ध्येयधोरणे तसेच जनहिताचे उपक्र म पोहोचवले जात नसल्याने मनसे मागे पडली आहे. हिंदुत्ववादी भूमिका घेऊन मनसेला फारसा उपयोग होईल, असे वाटत नाही. कारण नागरिकांना त्यांचे स्थानिक प्रश्न, समस्या सोडवणारे महत्त्वाचे वाटतात. मनसेचे स्थानिक पातळीवर संघटन नसल्याने भाजपशी युती करून वा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्यांना फायदा होणार नाही. भाजपच्या विरोधात इतकी टोकाची भूमिका घेतल्यावर भाजपसुद्धा मनसेला जवळ करेल, असे वाटत नाही. मनसेने भाजपशी जवळीक करून अन्य पक्षांप्रमाणे संधिसाधूंच्या पंक्तीत बसू नये, अशी अपेक्षा आहे.
- भावेश जोशी, मीरा रोड
भाजपतील अनेक अहंकारी नेत्यांमुळे शिवसेनेने नाइलाजास्तव काँगे्रस व राष्ट्रवादीसोबत विकास आघाडी केली. असे सर्वसामान्य नागरिकांना वाटते. भाजपपासून दुरावलेली शिवसेना तसेच कट्टर विरोध असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी यांची महाराष्ट्रावर सत्ता आल्याने भाजपतील बहुसंख्य नेत्यांचे राजकारण जड झाले. सर्वाधिक गर्दीच्या सभा व भाजपविरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उठविलेले रान यामुळे भाजप व मनसेत सूत जुळेल असे वाटत नाही. एकमेव आमदार निवडून आलेल्या मनसेला लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच सहकारी क्षेत्रात काहीच स्थान उरले नाही. राज्यात एकाकी पडलेल्या मनसेला भाजपसोबत येण्यासाठी जुन्या वस्त्राचा त्याग करून हिंदुत्वाचे वस्त्र घालण्यास भाग पडत असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये मनसेची अधिक कोंडी होणार असून राज यांच्यासारख्या परखड नेत्याला दबावाखाली राहता येणार नाही.
- सुरेश सोनावणे, उल्हासनगर