आरे ड्रग्स कारखान्यावर उत्पादन बंदीची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 08:00 AM2023-12-09T08:00:39+5:302023-12-09T08:00:47+5:30
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सलग तिसऱ्या वर्षी बजावली नोटीस, या कारखान्याचा वीज व पाणीपुरवठाही बंद करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नं. ई-३४ मधील आरे ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स लि. या कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे विभागाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी उत्पादन बंदीच्या कारवाईची गुरुवारी नोटीस बजावली आहे.
या कारखान्याचा वीज व पाणीपुरवठाही बंद करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. सलग तिसऱ्या वर्षी या कारखान्यावर उत्पादन बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये कारणे दाखवा नोटीसही प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती.
समाधानकारक खुलासा नाही...
आरे ड्रग्स या कारखान्यात उत्पादन निर्मिती करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमांचे केलेले उल्लंघन आणि कारखान्यातून रासायनिक सांडपाणी पुरेशी प्रक्रिया न करताच नैसर्गिक नाल्यामध्ये सोडले जात आहे. यामुळे या कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येऊन खुलासा मागवून झालेल्या सुनावणीत कारखाना व्यवस्थापनाने समाधानकारक खुलासा केला नाही, तसेच पाच व दहा लाखांची बँक गॅरंटी जमा केली नसल्याने अखेर कारखान्याकडून होणाऱ्या प्रदूषणाबाबत प्राप्त झालेल्या सर्व अहवालांची पाहणी व तपासणी केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ७ डिसेंबर रोजी कारखान्यावर उत्पादन बंदीची कारवाई केली आहे.