"आली गोळी छातीवर घेईन मी..."; 'लोकजागर'मधून उभा राहिला अवघा महाराष्ट्र
By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 11, 2023 05:03 PM2023-04-11T17:03:13+5:302023-04-11T17:04:11+5:30
ठाणे : 'आली गोळी छातीवर घेईन मी... पाणी चवदार तळ्याचे पिईन मी…' या ओळी सादर करत लोककलेचे गाढे अभ्यासक, ...
ठाणे : 'आली गोळी छातीवर घेईन मी... पाणी चवदार तळ्याचे पिईन मी…' या ओळी सादर करत लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्रा. गणेश चंदनशिवे म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार हे मोत्यासारखे आहेत, या विचारांना कुठेही तडा जाता कामा नये. वर्णव्यवस्थेने जो काही छळवाद मांडला होता, त्या छळवादावर 'मावशी' हे पात्र जलस्यातून मार्मिक भाष्य करायचे, जलसामध्ये गण आला, वंदन गीत आले. जलसातील गण आणि गौळण निघून गेले, पण 'मावशी' हे पात्र कायम राहिले. हे संचित आज लोप पावत चालले आहे. आजच्या जागतिकीकरणामध्ये या पूर्वीच्या अस्तगंत पावलेल्या कलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी म्हणून आमच्यासारखे लोककलावंत अशा प्रकारची मांडणी करण्याचा प्रयत्न करतात असे त्यांनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिकेने महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित 'लोकजागर' या कार्यक्रमात चंदनशिवे बोलत होते. दरम्यान, त्यांचा ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी व अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे यांच्या हस्ते ग्रंथबुके व छायाचित्र देवून सन्मान करण्यात आला. चंदनशिवे पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शाहिरांनी आपल्या कवनांमधून मांडण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमतेच्या विरोधात बंड उगारुन तथाकथित मनुवादी समाजाला धडा शिकवला, बुरसटलेले विचार, खोट्या कल्पना, कर्मकांडांना छेद दिला. मग तो काळाराम मंदिराचा प्रवेश असेल की महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन आंदोलन असेल, या सारख्या आंदोलनातून त्यांनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारले.
बाबासाहेबांच्या याच विचारांनी प्रेरित होवून पुढे अनेक समाजसुधारक, लोककलावंत आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित व्हायला लागले, त्यातील लोककलावंतातील एक भटकी जात म्हणजे रायरंद. ही मंडळी बाबासाहेबांचे विचार सांगत फिरायची, बहुरुप्याचे सोंग घेवून उंटावरुन यायचे, चावडीवर थांबायचे. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करीत हे लोक प्रबोधन करीत असल्याचे सांगत चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. ज्यांच्या विचारात बाबासाहेब आहेत, ज्यांच्या मेंदूमध्ये, डोक्यामध्ये बाबासाहेब आहेत. त्याची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. दहाव्या बाराव्या शतकामध्ये चक्रधराने परिवर्तनाची जी पताका हाती घेतली होती, ज्ञानेश्वरापासून एकनाथापर्यत, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सेनामहाराज यांनी समाजामध्ये चाललेल्या खुळचट रुढी, अंधश्रद्धा यावर मार्मिक भाष्य करण्याचे काम केले आहे. खऱ्या परिवर्तनाची पताका ही वारकरी संप्रदायामध्ये आहे म्हणून आपण त्यांना माऊली म्हणतो, पुरूष आणि स्त्रियानांही माऊली म्हटले जाते ही ताकद असल्याचे सांगत संत जनाबाईचा विचार त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून सादर केला.