जिवंत माणसाचा झाला कोरोना मृतांच्या यादीत समावेश; राज्य शासनाच्या पोर्टलचा चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 11:29 PM2021-07-01T23:29:24+5:302021-07-01T23:30:53+5:30
ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार. डेथ सर्टिफिकेट घेण्यासाठी जिवंत व्यक्तीलाच बोलावलं.
ठाणे : ठाण्यात एक ५५ वर्षीय व्यक्ती जिवंत असतांनाही त्याचा समावेश चक्क कोविडच्या मृत्यूच्या यादीत करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष याच व्यक्तीला फोन करुन पालिकेने खातरजमा करुन घेण्यासाठी बोलावले होते. परंतु आपण जिंवत असतांना मृतांच्या यादीत समावेश कसा झाला असा सवाल उपस्थित करीत त्यानेच पालिकेला अडचणीत आणले होते. परंतु ही चूक पालिकेची नसून पालिकेच्या दप्तरी ती व्यक्ती डिस्चार्ज झाल्याचेच दिसत आहे. मात्र शासनाकडून तयार करण्यात आलेल्या पोर्टवरच ही माहिती दिली गेली असल्याने ही चूक पालिकेची नसल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
ठाण्यातील घोडबंदर भागात राहणारे चंद्रशेखर देसाई यांना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घराच्या पत्त्याची पडताळणी करण्यासाठी पालिकेतून फोन आला होता. त्यावेळी ही पडताळणी करीत असतांना देसाई यांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची विचारणा त्यांना करण्यात आली. परंतु जिवंत माणसाला असा कसा सवाल करता असे देसाई यांनी संबधितांना विचारले. देसाई यांना गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना झाला होता. त्यावेळी घरीच उपचार घेऊन ते बरे झाले होते. या घटनेच्या वर्षभरानंतर त्यांचे नाव मृतांच्या यादीत आल्याने तेही चक्रावले आणि त्यांनी थेट पालिकेत धाव घेतली. त्यानंतर त्याठिकाणी गेल्यावर त्यांच्या निदर्शनास देखील २४ एप्रिल २०२१ रोजी मृत्यू झाल्याची तारीख समोर आली आहे. या तारखेचे मृत्युप्रमाणपत्रही जवळपास तयार झाल्याचे दिसत होते.
दरम्यान, या संदर्भात पालिकेच्या कोविड प्रतिबंधक अधिकारी डॉ. खुशबु टावरी यांच्याशी संपर्क साधला असता, ही चूक पालिकेची नसून कोविड इंडियाच्या पोर्टलची असल्याचे सांगितले. आमच्याकडील यादीत देसाई हे ऑगस्टमध्ये डिस्चार्ज असल्याचे दिसत होते. परंतु शासनाकडून ती माहिती आल्याने त्याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या घरी फोन करण्यात आला होता. त्यानुसार आता ही माहिती पुन्हा आम्ही शासनाकडे देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.