Vidhan sabha 2019 : उल्हासनगरमध्ये उमेदवारीच्या स्पर्धेत आयलानींची बाजी, कलानी कुटुंबाला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:51 AM2019-10-03T01:51:46+5:302019-10-03T01:52:01+5:30
भाजपच्या उमेदवारीच्या स्पर्धेत कुमार आयलानी यांनी बाजी मारल्याने, ओमी कलानी आउट झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : भाजपच्या उमेदवारीच्या स्पर्धेत कुमार आयलानी यांनी बाजी मारल्याने, ओमी कलानी आउट झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. आयलानी हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, ओमी कलानी टीमच्या काही पदाधिकाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई केल्याने कलानी कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वास धक्का लागला आहे.
उल्हासनगर महानगरपालिका सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने ओमी कलानी टीमसोबत आघाडी केली. मीना आयलानी यांच्या रूपाने भाजपला पहिल्या महापौर मिळाल्या. त्यांचा सव्वा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर ओमी टीमच्या पंचम कलानी महापौरपदी विराजमान झाल्या. दरम्यान, भाजपच्या उमेदवारीसाठी पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी आमदार कुमार आयलानी यांच्यासह ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनीही मुलाखत दिल्याने, आयलानी विरुद्ध कलानी असा सामना काही दिवसांपासून रंगला होता. पंचम कलानी यांना उमेदवारीचा शब्द दिल्याचा दावा ओमी टीमकडून सुरुवातीला करण्यात आला. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याला अवघे दोन दिवस बाकी असताना भाजपने पंचम कलानी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब न केल्याने कलानी कुटुंबात संशयाची पाल चुकचुकली.
भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कलानी नको, असे साकडे वरिष्ठांना घातले होते. त्यानंतर, आयलानी यांना हिरवा कंदील दिल्याची चर्चा शहरात बुधवारपासून रंगली असून, शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करून कुमार आयलानी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा दावा भाजपच्या गोटातून करण्यात येत आहे. ओमी कलानी यांची विरोधाची धार बोथट करण्यासाठी ओमी टीमच्या काही पदाधिकाऱ्यांवर बुधवारी रात्री हद्दपारीची कारवाई केल्याचीही चर्चा रंगली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता, १३ जणांवर तडीपारीची कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधितांना तडीपारीची पत्रे दिली नसल्याने त्यांची नावे उघड करता येत नाही, असेही त्यांनी सांगितले. एकूणच, आयलानी यांना उमेदवारी देऊन कलानी यांचे पंख छाटण्याचे काम भाजपने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कलानी कुटुंबाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
पंचम कलानी यांना उमेदवारी मिळण्याच्या आशेने आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पंचम कलानी यांचा प्रचारही सुरू केला होता. मात्र, ऐन वेळेवर भाजपने आयलानी यांना उमेदवारी दिल्याने कलानी कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.