Vidhan Sabha 2019: मुंब्रा-कळव्यासाठी भाजप, ठाण्यासाठी सेना आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:20 AM2019-09-28T01:20:03+5:302019-09-28T01:20:17+5:30

ठाणे शहर सोडण्यास भाजपचा स्पष्ट नकार : युतीमध्ये वादाची शक्यता

Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP for Mumbra-Kalva, army insistent for Thane | Vidhan Sabha 2019: मुंब्रा-कळव्यासाठी भाजप, ठाण्यासाठी सेना आग्रही

Vidhan Sabha 2019: मुंब्रा-कळव्यासाठी भाजप, ठाण्यासाठी सेना आग्रही

Next

- अजित मांडके

ठाणे : ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये महापालिकेतील काही घटनांमुळे आधीच बिब्बा पडला आहे. परंतु, आता ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघांवरून शिवसेना व भाजप आक्रमक झाल्याचे दिसत आहे. ठाण्याचा गड असलेला ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ पुन्हा मिळावा, यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत हा गड न सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. दुसरीकडे मुंब्रा-कळवा मतदारसंघावर भाजपने दावा करून हा मतदारसंघ शिवसेनेकडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावरून येत्या काही दिवसांत आणखी वादंग निर्माण होऊन युतीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ १९९० पासून शिवसेनेकडे होता. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढल्याने शिवसेनेला येथे पराभव पत्करावा लागला. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, हा गड पुन्हा मिळवण्यासाठी शिवसेनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी ठाण्यातील पदाधिकारी हा गड पुन्हा शिवसेनेला मिळावा, यासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावून आहेत. त्यातच, भाजपमध्ये गणेश नाईक आल्याने भविष्यात तेसुद्धा या मतदारसंघाच्या निमित्ताने शिवसेनेला जड जाऊ शकणार आहेत. त्यामुळेच भविष्यात मोठा दगाफटका होण्याआधीच हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत.

हा गड शिवसेनेला सोडला तर, भविष्यात ठाणे महापालिकेवरही पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे भाजपसुद्धा हा गड सोडण्याच्या मन:स्थितीत नाही. आगामी महापालिका निवडणुकीत ठाण्यात कमळ फुलवायचे, हा भाजपचा अजेंडा आहे. त्यादृष्टीने ठाणे शहर मतदारसंघ भाजपसाठी जमेची बाजू आहे. या पट्ट्यात भाजपकडे नगरसेवकांचे चांगले पाठबळ आहे. त्यामुळे या जोरावर महापालिका निवडणूक सर करायची तयारी भाजपने चालवली आहे. याशिवाय, प्रत्येक महापालिकेच्या ठिकाणी पक्षाचा एक आमदार असावा, असे भाजपचे सूत्र आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला दिला जाणार नाही, हे भाजपने निश्चित केले आहे.

दरम्यान, ठाण्यापाठोपाठ मुंब्रा-कळवा मतदारसंघातही आता शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मागील निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेने निवडणूक लढवली होती. भाजपनेही येथे आपले नशीब आजमावले होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघावर मजबूत पकड असल्याने दोघांनाही या मतदारसंघावर कब्जा मिळवता आलेला नाही. जितेंद्र आव्हाड या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, या भागात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने मुस्लिम मतांचे विभाजन करुन, या मतदारसंघावर कब्जा करण्याचे नियोजन शिवसेनेबरोबरच भाजपनेही आखले आहे. त्यामुळे आता जागा वाटपात हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येतो, हे पाहण्यासारखे राहणार आहे.

भाजपने केला मतदारसंघाचा सर्व्हे
मुंब्रा-कळव्यावर भाजपनेही दावा केला आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्यांनी केलेल्या या मतदारसंघाच्या सर्व्हेच्या आधारावरच त्यांनी हा दावा केला आहे. परंतु, शिवसेना हा मतदारसंघ सोडण्याच्या मन:स्थितीत नाही. ठाण्याच्या बदल्यात मुंब्रा-कळवा असे समीकरण काही जण जुळवत असले तरी, भाजप ठाणे शहर मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याने आता वरिष्ठ यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP for Mumbra-Kalva, army insistent for Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.