Vidhan Sabha 2019 : ऐन निवडणुकीत भाजप-सेनेत वितुष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:34 AM2019-09-18T00:34:14+5:302019-09-18T00:34:24+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- विधानसभा निवडणुकीसाठी भाजप - शिवसेना युतीचे घोडे अडले असताना, दुसरीकडे मीरा-भाईंदर महापालिकेतील युतीतील वाद टोकाला पोहोचले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha 2019 -BJP-Senate dissolved in Ain election | Vidhan Sabha 2019 : ऐन निवडणुकीत भाजप-सेनेत वितुष्ट

Vidhan Sabha 2019 : ऐन निवडणुकीत भाजप-सेनेत वितुष्ट

googlenewsNext

- धीरज परब 
मीरा रोड : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप - शिवसेना युतीचे घोडे अडले असताना, दुसरीकडे मीरा-भाईंदर महापालिकेतील युतीतील वाद टोकाला पोहोचले आहेत. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाच्या कामाची निविदा मंजुरी पुन्हा एकदा भाजपने नाकारल्याने शिवसेनेने महापौर डिंपल मेहता यांचे दालन, स्थायी समिती सभागृह आणि आयुक्तांच्या दालनाबाहेर केलेल्या तोडफोडीचे पडसाद दोन्ही पक्षांमध्ये उच्चस्तरावर उमटण्याची शक्यता आहे. एकूणच प्रकार पाहता, महापालिकेत आता युती राहिल की नाही, याबद्दल साशंकताच आहे.
२०१५ मध्ये पालिकेत भाजप, शिवसेना, बविआने राष्ट्रवादी व काँग्रेसला बाजूला करुन पहिल्यांदाच युतीची सत्ता स्थापन केली. परंतु काही काळातच आमदार तथा नगरसेवक नरेंद्र मेहता यांच्या कामकाजावरुन शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीची अनेक विषयांत कास धरली. तेव्हापासून भाजप-सेनेत धुसफुस सुरू झाली. २०१७ च्या पालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना स्वतंत्र लढल्यानंतर भाजपचे तब्बल ६१ नगरसेवक निवडून येऊन एकहाती सत्ता आली. त्यानंतर आ. मेहतांचा वारु चौफेर उधळू लागला. स्वत:चे प्रस्ताव महासभेत मंजूर करून घेतानाच शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागांत कामे करु न देणे, त्यांना प्रभाग समितीचा निधी न देणे, तसेच त्यांच्या प्रभागांत ढवळाढवळ करणे, असे प्रकार मेहता करत असल्याचे आरोप होऊ लागले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पालिकेत पुन्हा युती झाली तरी, सेनेच्या नगरसेवकांना काहीच फायदा झाला नाही. सेनेला एक प्रभाग समिती सभापती पद दिले गेले. पण कामंच होत नसल्याने नगरसेवकांमध्ये असंतोष होता. नगरसेवकांनाच नव्हे तर, आमदार सरनाईकांनादेखील मेहतांनी सतत कोंडीत पकडले. त्यांचे प्रस्तावदेखील मंजूर केले जात नव्हते. घोडबंदर किल्ल्याचा पाठपुरावा करणाऱ्या सरनाईकांना मंजुरीनंतरदेखील भूमिपुजनासाठी आडकाठी करण्यात आली. शासनाकडून मंजूर झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचे भूमिपुजनदेखील निवडणुकीआधी न होऊ देण्यामागे आ. मेहतांकडे बोटं दाखवली जातात. त्यातच निवडणुकीआधी आ. मेहतांनी शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागांतही त्यांना न जुमानता भूमिपुजनं उरकून घेतली.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भार्इंदरच्या जेसल पार्क येथे भाविकांच्या स्वागताकडून शिवसेनेकडून दरवर्षी लागणारा मंडप आ. मेहतांनी तक्रार करुन आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यामार्फत काढून टाकायला लावला. आ. सरनाईक यांनी सांगूनदेखील आयुक्तांनी जुमानले नाही. इतरांचे बेकायदा मंडप, स्टेज असताना शिवसेनेचाच मंडप काढल्याने झालेली नाचक्की सेनेच्या जिव्हारी लागली होती. त्यातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन - कलादालनातही आ. मेहतांकडून सुरुवातीपासून अडथळा आणला जात होता. निधी नसल्याचे कारण सांगून कलादालन रखडवले जात होते. शासनाची मंजुरी तसेच पालिकेच्या तरतुदीसह सेनेचे खासदार, आमदार, नगरसेवकांनी निधी दिला. जिल्हा प्रशासनानेदेखील निधी देण्याची तयारी दाखवली. पण निधी नसल्याचे कारण आणि शासनाकडून अनुदान आल्यावर करू, असं सांगून कलादालनाचा प्रस्ताव धुडकावला गेला. विधानसभा निवडणुकीआधी निदान भूमिपुजन करता येईल म्हणून सेनेने मंजुरीसाठी पुन्हा प्रयत्न केले. मात्र या मुद्यावर थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मेहतांनी जुमानले नाही. कलादालनाचा खर्च २५ कोटी असून, पुढे निधी मिळाला नाही तर काय, असा प्रश्न पुढे करुन पेच मारली. वास्तविक, मोठी कामं शहरात याआधीही झालेली असून, प्रकल्पाचा पूर्ण निधी एकाचवेळी उपलब्ध नसतोच. काम जसं होत जातं, तसं टप्प्याटप्प्याने अनुदान, अथवा कर्ज स्वरुपात निधी उभारला जातो. पण बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे काम निधीचे कारण दाखवून रखडवल्याने हा वाद पेटला.
>बाळासाहेबांचे कलादालन अडवून ठेवणं सेनेच्या जिव्हारी लागल्याचं मंगळवारी सेनेने केलेल्या राड्यावरुन दिसतं. शिवसेनेने पालिकेत केलेल्या तोडफोडीचे समर्थन निश्चितच करता येणार नाही. मात्र, मीरा भार्इंदरमध्ये शिवसेनेच्या वाघाचे दात मोजण्याचेच नव्हे तर ते पाडण्याचे कामदेखील आ. मेहता यांनी चालवले आहे. पण हे करताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या विरोधात घेतलेली भूमिका शिवसैनिकांना रुचलेली नाही. आजचा राडा हा यातूनच झाल्याचे चित्र दिसत आहे.
>काय आहे प्रकरण?
१शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीनंतर भार्इंदर पूर्वेच्या आझादनगर येथील आरक्षण क्र. १२२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावर आधारित कलादालन व सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी २५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास महासभेने मे २०१७ मध्ये मंजुरी दिली होती. बाळासाहेबांच्या कलादालनासह आरक्षण क्र. ३०० मध्ये २३ कोटी खर्चून भाजप नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कलादालनास मंजुरी दिली होती.
२गेल्यावर्षी राज्य शासनानेदेखील बाळासाहेबांचे कलादालन - सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी मान्यता दिल्यानंतर पालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद केली गेली होती. प्रभागातील स्थानिक चार शिवसेना नगरसेवकांनी आपला एकत्रित प्रभाग निधी मिळून ५० लाख देण्याची लेखी विनंती केली असता, भाजपचे प्रभाग समिती सभापती अरविंद शेट्टी यांनी त्याला कात्री लावली.
३दुसरीकडे खासदार राजन विचारे, आमदार सरनाईक व रवींद्र फाटक यांनी प्रत्येकी २५ लाखांचा निधी दिला. शिवाय जिल्हा प्रशासन, शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. परंतु भाजपचे गेल्यावर्षी स्थायी समिती सभापती असलेले ध्रुवकिशोर पाटील यांनी बाळासाहेबांच्या कलादालनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता, परिपूर्ण माहितीसह फेरप्रस्ताव द्यावा असे सांगत फेटाळून लावला. त्यानंतरही सेनेचा पाठपुरावा सुरू होता. लोकसभा निवडणुकीत युती झाल्याने बाळासाहेबांच्या कलादालनाची निविदा भाजप मंजूर करेल, असे सेनेला वाटले होते. परंतु भाजपने मात्र स्थायी समितीमध्ये बाळासाहेबांचा विषय घेण्यास टाळाटाळ केली.
४निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने भाजपने आतातरी प्रस्ताव घ्यावा अशी मागणी सेनेकडून होत होती. पालिकेनेदेखील स्थायी समिती सभापती अ‍ॅड. रवी व्यास यांना ठाकरे व महाजन कलादालनाच्या निविदा मंजुरीचा प्रस्ताव दिला. परंतु व्यास यांनी निधी कसा उभारणार, असा सवाल करत पत्र दिले. पालिकेनेदेखील काम टप्प्याटप्प्याने करणे शक्य होईल, असे स्पष्ट केले. पहिल्या टप्प्याच्या कामासाठी ५ कोटी ८३ लाखांच्या निविदा मंजुरीचा, तर महाजन कलादालनासाठी ४ कोटी ४२ लाखांच्या निविदा मंजुरीचा गोषवारा पालिकेने दिला होता.
>सचिवांच्या फिर्यादीवरुन पोलिसांची कारवाई
पालिका सचिव वासुदेव शिरवळकर यांच्या फिर्यादीवरुन महापालिकेतील तोडफोड, सरकारी कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन, सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली भार्इंदर पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या १७ नगरसेवकांसह अन्य १० जणांविरोधात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते प्रविण पाटील, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, राजु भोईर, तारा घरत, निलम ढवण, भावना भोईर, दिप्ती भट, वंदन विकास पाटील, दिनेश नलावडे, जयंतीलाल पाटील, अनंत शिर्के, कमलेश भोईर, धनेश पाटील, एलायस बांड्या, स्रेहा पांडे, हेलन गोविंद, शर्मिला बगाजी, कुसुम गुप्ता या १८ नगरसेवकांसह प्रवक्ते शैलेष पांडे आणि अन्य ८ ते १० जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
>महापौरांचा उद्धव ठाकरे यांना सवाल : गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नगरसेवकांनी पोलीस ठाण्यावर धडक देण्याचे ठरवले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र आयुक्त व पोलिसांनी याप्रकरणी कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर महापौर डिंपल मेहता यांनी महापौर दालनात नगरसेविकांसोबत एक व्हिडीओ बनवला. या व्हिडीओमध्ये त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याप्रकरणी सवाल केला आहे. एका महिला महापौराच्या दालनात तोडफोड व शिवीगाळ करून महिलांचा अपमान केल्याचे सांगत आ. सरनाईक, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न डिंपल यांनी ठाकरे यांना केला. महापौरांसह नगरसेविकांनी यावेळी निषेधाच्या घोषणादेखील दिल्या.
>सेनेला जशास तसे उत्तर देणार : या घटनेनंतर आ. मेहतांनी महापौर दालनात नगरसेवक, पदाधिकारी आदींची बैठक घेतली. यावेळी पालिकेत सेनेशी युती तोडण्यासह सेनेच्या ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघात काम न करण्याची भूमिका भाजपने मांडली. सेनेला जशास तसे उत्तर देण्याची गरज काहींनी बोलून दाखवली. आयुक्त व पोलिसांसोबतच्या चर्चेतदेखील सेनेच्या नगरसेवक, पदाधिकाºयांवर गुन्हा दाखल न केल्यास गप्प न बसण्याचा इशारा देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 -BJP-Senate dissolved in Ain election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.