निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सुसज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 12:05 AM2019-10-23T00:05:16+5:302019-10-23T00:05:32+5:30
ठाणे जिल्हयातील १८ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी १८ विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चित केलेल्या १८ मतमोजणी केंद्रावर मतमोजणी होणार असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सुसज्ज आहे.
ठाणे - ठाणे जिल्हयातील १८ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी १८ विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चित केलेल्या १८ मतमोजणी केंद्रावर मतमोजणी होणार असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सुसज्ज आहे. मतमोजणीच्या कामासाठी जवळपास १२०० कर्मचारी/अधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्यामार्फत अत्यंत पारदर्शीपणाने व अचूकतेने मतमोजणी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला.
राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षापासून येथील एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीत दिवसेंदिवस घट होतांना दिसत आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून पथनाटय़, मॅरेथॉन स्पर्धासह चित्रकला, स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांद्वारे जनजागृती केली. मात्र, तरीही यंदाही जिल्ह्यातील 18 पैकी 13 मतदारसंघात मतदानाचे प्रमाण 2014 च्या तुलनेत अडीच टक्क्यांनी घटले आहे.