Vidhan Sabha 2019: कल्याणमध्ये आमदाराविरोधात इच्छुकांची प्रदेशाध्यक्षांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:35 AM2019-09-26T00:35:58+5:302019-09-26T00:36:19+5:30

पश्चिमेत नाराजी;  उमेदवार बदलून द्या, अन्यथा पराभवाची भीती

Maharashtra Vidhan Sabha 2019 Interested run against state lawmaker in Kalyan | Vidhan Sabha 2019: कल्याणमध्ये आमदाराविरोधात इच्छुकांची प्रदेशाध्यक्षांकडे धाव

Vidhan Sabha 2019: कल्याणमध्ये आमदाराविरोधात इच्छुकांची प्रदेशाध्यक्षांकडे धाव

Next

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपला राखायचा असेल, तर पक्षाने उमेदवार बदलून द्यावा, अशी मागणी भाजपतर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात इच्छुकांनी मोट बांधत एक प्रकारे बंडाचा झेंडाच फडकवला आहे. इच्छुकांच्या या मागणीमुळे पक्षश्रेष्ठींसमोरही पेच निर्माण झाला आहे. पक्षश्रेष्ठी याप्रकरणी काय निर्णय घेणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून, पवार यांच्या मार्गातील अडचणी वाढल्या आहेत.

केडीएमसीचे स्थायी समितीचे माजी सभापती संदीप गायकर, भाजपचे माजी गटनेते वरुण पाटील, नगरसेविका वैशाली पाटील, परिवहन समितीचे माजी सदस्य महेश जोशी आणि पदाधिकारी साधना गायकर या इच्छुकांनी मंगळवारी मुंबईत पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन पाटील यांना दिले.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून १० जण इच्छुक आहेत. त्यात भाजप पदाधिकाऱ्यांसह एका शिवसेनेच्या पदाधिकाºयाचाही समावेश आहे. आॅगस्टच्या अखेरीस डोंबिवलीत भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यावेळी पवार यांनी कल्याण पश्चिमेतून पुन्हा उमेदवारी मागत पक्षाकडे मुलाखत दिली आहे. याच मुलाखतीवेळी पक्षातील १० इच्छुकांनीही मुलाखती दिल्या. ते पाहून पवार यांना धक्काच बसला होता.

मुलाखतीनंतर काही दिवस उलटत नाही, तोच पक्षातील इच्छुकांनी प्रदेशाध्यक्षांकडे उमेदवार बदला, अन्यथा मतदारसंघ हातून जाईल, अशी भीती व्यक्त करीत पक्षावर उमेदवार बदलासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. पवार हे सक्षम उमेदवार नाहीत, असा दावा या इच्छुकांनी केला आहे. प्रदेशाध्यक्षांनी या इच्छुकांचे निवेदन घेत त्यांना तूर्तास यासंदर्भात माहिती घेऊ, असे मोघम आश्वासन दिले आहे. यासंदर्भात पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांत मतदारसंघात मी प्रामाणिकपणे विकासकामे केली आहेत. मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा केला आहे. काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे इच्छुकांनी मागणी केली असली, तरी उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाला द्यायची नाही, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही पवार याबाबत म्हणाले.

एकीकडे पवार यांना पक्षातील इच्छुकांकडून उघडपणे विरोध होत असताना कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेला द्यावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेतील इच्छुकांकडून केली जात आहे. शिवसेना-भाजप युतीचे जागांच्या वाटपावर घोडे अडलेले आहे.
युती होते की नाही, यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही. युती झाल्यास हा मतदारसंघ विद्यमान आमदार भाजपचा असल्याने भाजपच्याच वाट्याला जाणार आहे. भाजप आपल्या आमदाराची जागा शिवसेनेला सोडणार नाही. तसेच विद्यमान आमदार बदलला जात नाही. त्याला पुन्हा उमेदवारी दिली जाते, असा अलिखित संकेत बहुसंख्य मतदारसंघांत बहुसंख्य पक्षांकडून पाळला जातो.

ऊर्जामंत्र्यांनी केली होती पवारांची स्तुती
निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एका ज्ञाती समाजाच्या कार्यक्रमास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी पवार हे राज्यातील टॉपटेन आमदारांच्या यादीतील आमदार आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. पक्षाच्या मंत्र्यानेच स्वत: हे प्रमाणपत्र दिले असताना, आता पक्षस्तरावर हा मुद्दा कितपत गांभिर्याने घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Interested run against state lawmaker in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.