Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ सेनेच्या वाट्याला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:13 AM2019-10-02T01:13:00+5:302019-10-02T01:13:31+5:30

कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो भाजपला सोडू नका. भाजपला हा मतदारसंघ दिल्यास शिवसेनेच्या इच्छुकांपैकी एक उमेदवार उभा केला जाईल, अशी मागणी करत शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाळीचा इशारा दिला होता.

Maharashtra Vidhan sabha 2019 : Kalyan West constituency to the Shiv Sena, but ... | Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ सेनेच्या वाट्याला, पण...

Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ सेनेच्या वाट्याला, पण...

Next

कल्याण : कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो भाजपला सोडू नका. भाजपला हा मतदारसंघ दिल्यास शिवसेनेच्या इच्छुकांपैकी एक उमेदवार उभा केला जाईल, अशी मागणी करत शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाळीचा इशारा दिला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत कल्याण पश्चिम शिवसेनेच्या वाट्याला आला. मात्र इच्छुकांऐवजी शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे इच्छूकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
यावर्षी लोकसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेतील शिवसैनिकांनी विधानसभेचा हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला, तरच भाजप उमेदवार कपील पाटील यांच्यासाठी काम करण्याची अट घातली होती. लोकसभा निवडणूक पार पडल्यावर शिवसैनिक मागणीवर ठाम होते. कल्याण पश्चिमेतून शिवसेनेतर्फे राजेंद्र देवळेकर, विश्वनाथ भोईर, श्रेयस समेळ, रवी पाटील, सचिन बासरे, अनिल ढेरे, अरविंद मोरे, मयूर पाटील, साईनाथ तरे, प्रकाश पेणकर हे उमेदवार इच्छूक होते. या मुद्यावर त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतरही हालचाली होत नसल्याने पाहून इच्छूकांनी शिवसेना शहर शाखेत पत्रकार परिषद घेऊन भाजपविरोधात बंडाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिला. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी सर्व इच्छुकांना सोमवारी मुंबईत बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. पक्षाच्या नेतृत्वाकडे अटीशर्ती घालून चर्चा करता येत नाही. पक्षप्रमुखांना अटी घालून तुमचा विषय कसा काय मांडू? तुमच्या मागणीनुसार मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला मागून घेतो. मात्र पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल, तो निवडून आला पाहिजे. इच्छुकांनी त्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे. उमेदवाराचा पराभव झाला तर, इच्छुकांपैकी एकाही उमेदवाराला २०२० च्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदाची उमेदवारी दिली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला. रात्री उशिरापर्यंत यावर खलबते सुरु होती. सर्व इच्छूक पहाटे घरी परतले. मंगळवारी सकाळी कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला असल्याची गोड बातमीही मिळाली. हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकू शकला नाही.

‘निवडणूक लढवण्याबाबत अद्याप आदेश नाही’
प्रकाश पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, कल्याण पश्चिम हा लोकसभेच्या रचनेनुसार भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो. लोकसभा, विधानसभा आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत मी पक्षाचे काम करतो. उद्धव ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर मला कल्याण पश्चिमेतून निवडणूक लढवावीच लागेल. मात्र अद्याप मला तसे आदेश प्राप्त झालेले नाहीत. मी इच्छुक म्हणून मुलाखत दिली नसली तरी, पक्षाने सांगितल्यास मी निवडणूक लढवेन. माझा अन्य इच्छुकांना विरोध नाही. तसेच त्यांचाही मला विरोध असण्याचे कारण नसावे.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019 : Kalyan West constituency to the Shiv Sena, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.