Vidhan sabha 2019 : ठाणे शहर विधानसभेसाठी हट्ट, निष्ठावान शिवसैनिकांचा भाजपशी असहकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:41 AM2019-10-01T01:41:46+5:302019-10-01T01:43:04+5:30

ठाणे शहर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ही जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी आता निष्ठावान शिवसैनिक आग्रही झाले आहेत.

Maharashtra Vidhan sabha 2019 : Loyalist Shiv Sainik Non-cooperation with BJP in Thane City Assembly seats | Vidhan sabha 2019 : ठाणे शहर विधानसभेसाठी हट्ट, निष्ठावान शिवसैनिकांचा भाजपशी असहकार

Vidhan sabha 2019 : ठाणे शहर विधानसभेसाठी हट्ट, निष्ठावान शिवसैनिकांचा भाजपशी असहकार

Next

ठाणे : ठाणे शहर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ही जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी आता निष्ठावान शिवसैनिक आग्रही झाले आहेत. ही जागा भाजपला दिल्यास निवडणुकीत त्यांना सहकार्य न करण्याचा इशारा त्यांनी टेंभीनाक्यावरील कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत दिला. विशेष म्हणजे भाजपविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. तसेच वेळ पडल्यास पदाचा राजीनामा देण्याची तयारीसुद्धा त्यांनी केली आहे. त्यामुळे ठाण्याचे आव्हान भाजपला कठीण जाणार असल्याचे दिसत आहे.

शिवसेना आणि भाजपची युती नक्की असून त्यानुसार ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा पुन्हा भाजपकडे जाणार आहे. परंतु, हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा, यासाठी सुरुवातीपासून शिवसैनिकांनी आग्रह धरला होता. मात्र, आता तो भाजपकडे जाणार असल्याचे निश्चित झाल्याने निष्ठावान शिवसैनिकांनी याविरोधात असहकार पुकारला आहे. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे स्वबळावर लढल्याने ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर विजयी झाले होते, तर शिवसेनेचे रवींद्र फाटक हे थोड्या फार मतांनी पराभूत झाले होते.

दरम्यान, मागील वेळेस आमच्याकडून काही चुका झाल्या होत्या. त्यामुळेच शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. परंतु, आम्हाला आता ही चूक सुधारायची असून शिवसेनेलाच हा मतदारसंघ मिळावा, अशी एकमुखी मागणी या बैठकीत शहरप्रमुख, उपशहरप्रमुख आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी केली. या बैठकीत उपस्थित असलेल्या जगदीश थोरात, हेमंत पवार, प्रकाश पायरे, दीपक म्हस्के, किरण नाकती आदींसह इतर निष्ठावान मंडळींनी ही मागणी केली. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, यासाठी आता या मंडळींनी श्रेष्ठींकडे पत्रव्यवहार केला आहे.

पूर्वीपासून ठाण्यावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेचाच बालेकिल्ला होता. महापालिका निवडणुकीतही ते आम्ही सिद्ध केले आहे. तसेच घरोघरी प्रचारासाठी आम्हीच आघाडीवर असतो. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

परंतु, आता जर हा मतदारसंघ भाजपला दिला जाणार असेल, तर भाजपचा प्रचार न करण्याचा इशाराही या बैठकीत या मंडळींनी दिला. तसेच वेळ पडल्यास आमच्यावर पक्षाने जबरदस्ती केली, तर आम्ही पदांचे राजीनामे देऊ, मात्र भाजपचा प्रचार करणार नाही, असा निर्णयही या बैठकीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूणच या निष्ठावान शिवसैनिकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. यावर आता वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मनधरणी होणार का?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांचा प्रचार न करण्याचा निर्णय भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी घेऊन शिवसेनेवर दबावतंत्र वापरले होते. आता त्याचा पलटवार कदाचित निष्ठावान शिवसैनिकांनी विधानसभा निवडणुकीत करण्याचे निश्चित केले आहे. त्यावेळेस भाजपच्या नाराज नगरसेवकांची मनधरणी करण्यात आली होती. आता शिवसेनेच्या नाराजांची मनधरणी केली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मागील वेळेस झालेल्या काही चुकांमुळे हा मतदारसंघ आमच्याकडून भाजपकडे गेला होता. परंतु, पूर्वीपासून तो शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे तो परत मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे. तसे न झाल्यास वेळ पडली तर आम्ही आमच्या पदांचे राजीनामे देऊ, मात्र भाजपचा प्रचार करणार नाही.
जगदीश थोरात, शिवसैनिक

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच होता. परंतु, आता तो भाजपकडे जाणार असल्याने ते आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना न पटण्यासारखे आहे. त्यामुळेच आम्ही हा मतदारसंघ परत मिळावा म्हणून श्रेष्ठींकडे मागणी करीत आहोत.
किरण नाकती, शिवसैनिक

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019 : Loyalist Shiv Sainik Non-cooperation with BJP in Thane City Assembly seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.