Vidhan Sabha 2019: मनसेतील इच्छुकांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:20 AM2019-09-24T00:20:52+5:302019-09-24T00:21:09+5:30
कल्याण ग्रामीण मतदारसंघात मेळावा : मनसेतील इच्छुकांची तयारी सुरू
कल्याण : कल्याण ग्रामीण व डोंबिवली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेकडे तुल्यबळ उमेदवार आहेत. स्थानिक पातळीवर त्यांनी निवडणुकीची तयारीही केली आहे. मात्र, पक्षप्रमुखांच्या आदेशाची वाट कार्यकर्ते पाहत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.
दूर्वांकुर सभागृहात झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्या मेळाव्यास मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, कल्याण-डोंबिवलीतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, मनोज घरत, नगरसेविका सरोज भोईर, पदाधिकारी राहुल कामत, हर्षद पाटील, प्रकाश माने, महिला आघाडीच्या मंदा पाटील, दीपिका पेडणेकर आदी उपस्थित होते.
कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील इच्छुक आहेत. पाटील यांनी २०१४ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ते कडवी झुंज देऊ शकतात, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून मंदार हळबे हे इच्छुक आहेत. हळबे यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेते व गटनेतेपद भूषविले आहे. या पदावर असताना त्यांनी महापालिकेतील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. हळबे हे ब्राह्मण आहेत. डोंबिवलीत ब्राह्मणबहुल मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्याचा मनसेला फायदा होऊ शकतो. डोंबिवली व कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांत मराठी मतांचे प्राबल्य आहे. ही मराठी मते मनसेला मिळू शकतात, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
२००९ मध्ये मनसेला कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण विधानसभेवर यश मिळाले होते. २०१०च्या निवडणुकीत मनसेचे २८ नगरसेवक महापालिका निवडणुकीत निवडून आले होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. कल्याण-डोंबिवली परिसरातील मतदारसंघांतून मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असा होरा तेव्हा त्यांनी स्पष्ट केला होता. मनसेच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी केली असली तरी ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतेही संकेत आलेले नाहीत. त्यामुळे मनसे कार्यकर्ते त्यांच्या आदेशाची वाटप पाहत आहेत. दरम्यान, कल्याण पश्चिमेतून माजी आमदार प्रकाश भोईर इच्छुक आहेत. मात्र, कल्याण पूर्व मतदारसंघातून उमेदवाराच्या नावाची चर्चा नाही. उल्हासनगर, अंबरनाथ मतदारसंघांतून मनसेकडून काही जण इच्छुक आहेत.
नागरिकांचे प्रश्न घेऊन उतरणार रिंगणात
मनसेच्या १० नगरसेवकांनी डोंबिवलीत १० उद्याने विकसित केली आहेत. तसेच मनसेने कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या प्रश्नांना घेऊन मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहे, याकडे मेळाव्यात लक्ष वेधण्यात आले.