Vidhan sabha 2019 : ठाण्यात सेना-भाजपचा एकमेकांना असहकार, प्रचार न करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:16 AM2019-10-02T01:16:50+5:302019-10-02T01:22:26+5:30
ठाणे पक्षाचा बालेकिल्ला असल्याने ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसैनिकांनी आग्रह धरला होता. यामुळे शिवसेनेला आता जशाच तसे उत्तर देण्यासाठी ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
ठाणे : ठाणे पक्षाचा बालेकिल्ला असल्याने ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसैनिकांनी आग्रह धरला होता. यामुळे शिवसेनेला आता जशाच तसे उत्तर देण्यासाठी ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिक भाजपचा प्रचार करणार नसतील तर ओवळा -माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघातही भाजपचे पदाधिकारी हे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचाराच्या मुद्यावरून कलगीतुरा रंगू लागला आहे.
शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी काही मतदार संघात वाद सुरू आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा असा निष्ठावान शिवसैनिकांनी हट्ट धरला होता. मात्र, आता भाजपचे उमेदवार म्हणून संजय केळकर यांच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा असहकार कितपत टिकणार हे आता समजू शकलेले नाही. असे असले तरी केळकर यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकवटले असून त्यांची एक गुप्त बैठक ठाण्यात पार पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार केळकर यांच्या विरोधात सर्वपक्षीयांच्या वतीने एक उमेदवार दिला जाणार असून तोच ३ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरेल असेही बोलले जात आहे. मात्र, शिवसेनेचे वरिष्ठ मंडळी यावर तोडगा काढणार असल्याचेही सांगितले जात आहे.
भाजपचे प्रत्युत्तर
शिवसैनिकांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात असहकार पुकारल्याने त्यांचे प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपही सज्ज झाली आहे. शिवसेनेने केळकर यांचा प्रचार न केल्याने आता भाजपनेही ओवळा माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेनेचा प्रचार करणार नसल्याचे धोरण अवंलबले आहे.