Vidhan sabha 2019 : प्रताप सरनाईक, सुभाष भोईरांना शिवसेनेने दिली पुन्हा संधी, नाराजांच्या भूमिकेकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 02:22 AM2019-10-01T02:22:39+5:302019-10-01T02:23:00+5:30
शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप सुरूझाले आहे. त्यानुसार, ओवळा-माजिवडा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघांतील संभावित बंडाळी थोपविण्यासाठी श्रेष्ठींनी प्रताप सरनाईक आणि सुभाष भोईर यांना अगोदरच एबी फॉर्म दिला आहे.
ठाणे : शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप सुरूझाले आहे. त्यानुसार, ओवळा-माजिवडा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघांतील संभावित बंडाळी थोपविण्यासाठी श्रेष्ठींनी प्रताप सरनाईक आणि सुभाष भोईर यांना अगोदरच एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी जरी हा तिढा सोडवला असला, तरी स्थानिक पातळीवर मात्र अजूनही शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे नाराज आदेश पाळणार की बंड करणार, याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानुसार, ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सरनाईकांविरोधात काहींनी मुलाखती देऊन आव्हान निर्माण केले होते. यामध्ये महापौर मीनाक्षी शिंदे, नरेश मणेरा आदींचा समावेश होता. शिवाय, सरनाईक यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी मोठी लॉबिंग सुरू होती. परंतु, पक्षाने सलग तिसऱ्यांदा सरनाईक यांच्यावर विश्वास टाकला असून युती जाहीर होण्यापूर्वीच एबी फॉर्म दिला. त्यामुळे सरनाईकांविरोधात आघाडी उघडणाºया पक्षातील मंडळींना श्रेष्ठींनी हादरा दिला आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये नाराजी
कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या विरोधातदेखील काहींनी बंड थोपटले होते. त्यानुसार, उमेदवारी आपल्यालाच मिळावी, या दृष्टीने रमेश म्हात्रे, राजेश मोरे, दीपेश म्हात्रे, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी आदींनी मुलाखती देऊन भोईरांपुढे कडवे आव्हान उभे केले होते. परंतु, वरिष्ठांनी या नाराजांचे कडवे आव्हान ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच थंड केले असून भोईर यांच्यावरही सलग दुसऱ्यांदा विश्वास टाकून अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. त्यानुसार, येत्या ३ आॅक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना श्रेष्ठींनी संभावित बंडाळी टाळण्यासाठीच हा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदेंचीही उमेदवारी निश्चित
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला. ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शिंदे यांची उमेदवारी तशीही निश्चितच होती. सोमवारी केवळ एबी फॉर्म देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
पांडुरंग बरोरा यांना सेनेची उमेदवारी
१शहापूर विधानसभा निवडणुकीसाठी आमदार पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेची उमेदवारी निश्चित झाली असून, त्यांना सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्मही दिला आहे. १० जुलै रोजी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश घेतला, तेव्हाच निष्ठावान शिवसैनिकांनी विभागवार बैठका घेऊन नाराजी व्यक्त केली होती.
२या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले माजी आमदार दौलत दरोडा, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर तळपाडे, गजानन गोरे आदींनी पत्रकार परिषद घेऊन, पांडुरंग बरोरा यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेचे काम करणार नाही, असा पवित्रा घेतला होता. परंतु, शिवसैनिकांच्या या नाराज गटाची साधी दखलदेखील न घेतल्याने त्यांच्यात असंतोष खदखदत आहे.
३ही नाराजी मतपेटीतून व्यक्त करण्याचा इशारा नाराज शिवसैनिकांनी दिला आहे. सध्या आम्ही वेट अॅण्ड वॉच अशी भूमिका घेतली आहे. मात्र, योग्यवेळी शिवसेनेला धडा शिकवू, असे या शिवसैनिकांनी म्हटले आहे. माजी आमदार दौलत दरोडा यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास शहापूर विधानसभा मतदारसंघात दरोडा आणि बरोरा यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
बालाजी किणीकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
१अंबरनाथ विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. किणीकर यांना शिवसेनेने एबी फॉर्म दिला असून, याबाबत भाजपच्या गोटामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यामुळे १५ दिवसांपूर्वीच शिवसेनेत दाखल झालेले सुबोध भारत यांचे उमेदवारी मिळण्याचे स्वप्न भंगले आहे.
२बालाजी किणीकर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, त्यांचा पत्ता कट करण्यासाठी शिवसेनेचा एक गट सक्रिय होता. दुसरीकडे भाजपनेदेखील किणीकर यांची उमेदवारी धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता.
३मात्र, किणीकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याने भाजप तोंडघशी पडली आहे. आता भाजपचे नाराज पदाधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे अंबरनाथकरांचे लक्ष लागून आहे. आपल्या उमेदवारीबाबत कोणताही संभ्रम नव्हता. आता मित्रपक्षांना घेऊन काम करणार असल्याचे आमदार बालाजी किणीकर यांनी सांगितले.