Vidhan sabha 2019 : आधी पाणी द्या, नंतर मत मागा, डोंबिवलीच्या देसलेपाड्यात बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 02:15 AM2019-10-01T02:15:26+5:302019-10-01T02:15:47+5:30

निवडणूक म्हटले की, नागरी समस्यांवर चर्चा आलीच. कल्याण ग्रामीण मतदारसंघात असलेल्या डोंबिवलीनजीकच्या देसलेपाड्यातील एका सोसायटीने पाण्याच्या समस्येबाबत लावलेले बॅनर सध्या चर्चेत आहे.

Maharashtra Vidhan sabha 2019:  Water first, then ask for votes, banner in Dombivali's Doslepada | Vidhan sabha 2019 : आधी पाणी द्या, नंतर मत मागा, डोंबिवलीच्या देसलेपाड्यात बॅनर

Vidhan sabha 2019 : आधी पाणी द्या, नंतर मत मागा, डोंबिवलीच्या देसलेपाड्यात बॅनर

Next

कल्याण : निवडणूक म्हटले की, नागरी समस्यांवर चर्चा आलीच. कल्याण ग्रामीण मतदारसंघात असलेल्या डोंबिवलीनजीकच्या देसलेपाड्यातील एका सोसायटीने पाण्याच्या समस्येबाबत लावलेले बॅनर सध्या चर्चेत आहे. आधी पाणी द्या, नंतर मत मागा, अशा आशयाचा हा बॅनर लावून, या सोसायटीने आपल्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

देसलेपाडा येथील भद्रानगर गृहनिर्माण सोसायटीत १२८ सदनिका आहेत. या सदनिकाधारकांकडून मार्च २०१९ पर्यंत पाण्याचे बिल कल्याण-डोंबिवली महापालिकेस भरण्यात आले आहे. पाण्याचे बिल भरले जाते. मात्र, सोसायटीच्या नळांमध्ये पाणीच येत नाही. त्यामुळे सोसायटीकडून खाजगी आणि महापालिकेचा पाणीटँकर मागवला जातो. खाजगी टँकरला १६०० रुपये तर महापालिकेच्या टँकरला ४०० रुपये मोजावे लागतात. महापालिकेकडून मोजकेच टँकर दिले जातात. टंचाईग्रस्त भागाला मोफत पाणी दिले जाणे आवश्यक आहे. महापालिकेचे पाणीबिल भरूनदेखील सोसायटीला पाण्याच्या टँकरपोटी महिन्याला ५० हजार रुपयांचा खर्च येतो.

टँकरचे पाणी पिण्यासाठी योग्य नसते. त्यामुळे पिण्याकरिता सदनिकाधारकांना पाण्याचा बाटला खरेदी करावा लागतो. पाच लीटर पाण्याचा एक बाटलासाठी ७० रुपये मोजावे लागतात. ज्यांच्या घरात जास्त सदस्य आहे, त्यांना १५ लीटरचा पाण्याचा बाटला खरेदी करावा लागतो. टँकरव्यतिरिक्त शुद्ध पाणीखरेदीचा खर्च वेगळा होतो. पाण्याची समस्या केवळ सोसायटीपुरतीच मर्यादित नाही. देसलेपाड्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे.

सोसायटीने पाण्यासाठी सर्वांकडे पाठपुरावा केला. मात्र, समस्या न सुटल्याने त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती. पाणीसमस्या सोडविण्याचे आश्वासन प्रत्येकाकडून दिले जात आहे. प्रत्यक्षात समस्या जैसे थे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही पाणीसमस्या सोडवण्याचे आश्वासन दिले गेले. ही निवडणूक पार पडून चार महिने उलटले, तरी आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. अखेरीस सोसायटीने आधी पाणी द्या, नंतर मते मागा, असा सज्जड इशाराच विधानसभा निवडणुकीसाठी मते मागण्याकरिता येणाऱ्या उमेदवारांना दिला आहे.

हा इशारा पाहता जे सत्तेत नव्हते, ते मते मागण्यासाठी येतील. त्यांच्याकडून हा मुद्दा प्रकर्षाने उचलला जाईल. प्रत्यक्षात हा भाग कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या मतदारसंघात येतो. शिवसेनेने त्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.

या समस्येबाबत भोईर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी बोलणे झालेले आहे. देसलेपाडा हा २७ गावे परिसरात येतो. या भागाला एमआयडीसी पाणीपुरवठा करते. आयुक्त व एमआयडीसी यांच्याशी बोलून सोसायटीच्या पाण्याची समस्या सोडविली जाईल, असे ते म्हणाले.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019:  Water first, then ask for votes, banner in Dombivali's Doslepada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.