Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 06:18 PM2024-11-06T18:18:55+5:302024-11-06T18:20:21+5:30
Maharashtra Election 2024: नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात ३२ उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही मतदारसंघात मतविभाजनामुळे धक्कादायक निकालाची चर्चा होत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूरमधून प्रमुख उमेदवारांसह अपक्ष आणि छोट्या पक्षांचे ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील बेलापूरमध्ये ११, तर ऐरोलीत १३ अपक्षांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघात चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत, असे असले तरी मैदानात असलेले अपक्ष उमेदवार कोणाची मतपेटी पोखरतील, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.
बेलापूरमध्ये एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपच्या मंदा म्हात्रे, शरद पवार गटाचे संदीप नाईक, मनसेचे गजानन काळे आणि शिंदेसेनेचे बंडखोर विजय नाहटा यांच्यात लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
मैदानात असलेले अपक्ष आणि इतर लहान मोठ्या पक्षांच्या ११ उमेदवारांमुळे मतविभाजन होण्याची शक्यता आहे. ऐरोलीमध्ये १७ उमेदवार रिंगणात आहेत.
त्यापैकी भाजपचे गणेश नाईक, उद्धवसेनेचे एम. के. मढवी, मनसेचे नीलेश बाणखिले आणि शिंदेसेनेचे बंडखोर विजय चौगुले हे प्रमुख उमेदवार आहेत. अपक्ष आणि इतर लहान पक्षांचे १३ उमेदवार आहेत. या उमेदवारांमुळे विजयाचे गणित बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
२०१९ च्या निवडणुकीत काय?
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐरोलीमधून भाजपचे गणेश नाईक विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश शिंदे यांचा तब्बल ७८,४९४ मतांनी पराभव केला होता. यावेळी अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आठ उमेदवार रिंगणात होते.
यापैकी वंचित आघाडीच्या उमेदवाराला १३ हजार ४२४ मते पडली होती, तर बहुजन समाजवादी पार्टीच्या उमेदवाराने १३७६ मते घेतली होती. वंचित व बीएसपीसह आठ अपक्षांनी तब्बल १७ हजार ५९४ मते घेतली होती.
बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक गावडे यांचा ४३ हजार ५९ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत छोट्या पक्षांसह १३ अपक्ष मैदानात उतरले होते. त्यांना एकूण १०,७५६ मते मिळाली होती.
यावेळी छोटे पक्ष आणि अपक्ष किती मते घेतात, बंडखोरांना किती मिळतात, यावरच महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचे जय पराजयाचे अंतर ठरणार आहे.