राजस्थान फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राचा ‘तारा’ चमकला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 01:32 AM2019-06-11T01:32:07+5:302019-06-11T01:32:26+5:30
३५० लघुपटांतून झाली निवड : देवदासी प्रथेमधील गैरकृत्यांवर प्रकाश, कल्याण-डोंबिवलीतील कलाकारांचा समावेश
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : राजस्थान फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रातून ‘तारा’ या एकमेव मराठी लघुपटाची निवड झाली असून सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळाला आहे. ‘तारा’ हा लघुपट देवदासी प्रथेच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर आधारित आहे. ‘तारा’ नावाच्या एका मुरळीची ही कहाणी आहे, अशी माहिती लघुपटाचे दिग्दर्शक आकाश कांबळे यांनी दिली. या लघुपटातील कलाकार कल्याण, डोंबिवली, आंबिवली या परिसरांतील असून बिर्ला महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी आहेत.
राजस्थान येथे नुकताच डेजर्ट एज ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल पार पडला होता. या फेस्टिव्हलमध्ये ‘तारा’ या लघुपटाची सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून निवड झाली. संपूर्ण जगभरातून ३५० लघुपट या फेस्टिव्हलमध्ये आले होते. त्यातील ४८ निवडण्यात आले. ‘तारा’ या लघुपटाचे कथालेखक सतीश खडके असून नोव्हेंबर २०१७ ला त्यांनी ही कथा लिहिली. त्यानंतर, त्यांनी ही कथा वाचून दाखवली. ही कथा भावल्यामुळे तिच्यावर नंतर अभ्यास सुरू झाला.
या लघुपटाविषयी दिग्दर्शक कांबळे म्हणाले की, जेजुरी, अहमदनगर या ठिकाणी अडीच महिने फिरत होतो. ज्याठिकाणी या मुरळ्या भेटत होत्या, तेथे त्यांच्या आयुष्यात आलेल्या वाईट प्रसंगांची नोंद घेऊन त्यावर कथेचा दुसरा भाग तयार केला. या लघुपटाची संकल्पना तयार होती, मात्र प्रत्यक्ष भेटल्यामुळे कथा परिपक्व झाली. त्यांच्या वेशभूषेचा, बोलण्याच्या ट्युनिंगचा अभ्यास करता आला. त्यानुसार, कथानकांचे डायलॉग लिहिण्यात आले. या लघुपटाचे चित्रीकरण कोल्हापूर आणि जेजुरी या दोन ठिकाणी झाले आहे. मे २०१८ मध्ये या लघुपटाचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली होती.
प्रियंका जावळे, रोशनी राजभर, निकिता जंगम, स्वाती वर्मा यांनी सहायक कलाकार म्हणून इतर मुरळ्यांचे काम केले होते. विकास सांगळे, किरण केंडे, गणेश वाघमारे, सौरभ बामणे, जितेंद्र कांबळे, अजित कांबळे, पवन व्हामने, नितीन कांबळे या कलाकारांनीही भूमिका केल्या आहेत. या कथेतून समाजाला संदेश द्यायचा उद्देश नव्हता, तर ही प्रथा समाजात बंद असली, तरी अप्रत्यक्षरीत्या सुरू आहे. मुरळीचे जे दु:ख दिसले, ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना आपण नेहमी पाहतो, पण त्यांना कधीही आपण जाणले नाही. हा लघुपट ४३ मिनिटे २७ सेकंदांचा आहे. याशिवाय, अनेक फेस्टिव्हलमध्ये ही फिल्म पाठवली आहे. त्यांचा रिझल्ट येणे बाकी आहे. या लघुपटातील सर्व कलाकार हे कल्याण, डोंबिवली, आंबिवली या परिसरांतील असून बिर्ला महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी आहेत. गणेश वाघमारे आणि जितेंद्र कांबळे वगळता कुणीही अभिनयाच्या क्षेत्रात नाही. इतर सर्व कलाकारांना अडीच महिने वर्कशॉप घेऊन प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.
आकाशचा दुसरा लघुपट
आकाश हा तीन वर्षांपासून फिल्म मेकिंगचे काम करत आहे. त्याने प्रथम ‘उंबरठा’ हा लघुपट तयार केला होता. ‘उंबरठा’ या लघुपटातील नायिकेच्या बहिणींनी घरातून पळून जाऊन लग्न केले. त्यामुळे तिला काय सहन करावे लागते, हे सांगितले आहे. ‘तारा’ ही आकाशची दुसरी निर्मिती आहे. ‘उंबरठा’ या लघुपटाला पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म म्हणून घोषित करण्यात आले होते. याशिवाय, लायटिंग आणि डिझाइन यासाठीचे पारितोषिक अजिंक्य केणे याला मिळाले होते.