आरक्षण सोडत तारखेसाठी महाशिवरात्रीचा मुहूर्त?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:35 AM2020-02-21T01:35:44+5:302020-02-21T01:36:00+5:30
निवडणूक आयोगाकडे लक्ष : प्रभागरचनेला मिळाली मंजुरी
पंकज पाटील
अंबरनाथ/ बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना निश्चित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रभाग रचनेतील त्रुटी दूर करुन त्याला रितसर मंजुरी मिळणे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची तारीख निश्चित करण्यात येत आहे. या संदर्भात महाशिवरात्रीला आदेश येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रभाग रचनेची अधिसूचना निघताच आरक्षणाची तारीखही निश्चित होणार आहे.
१८ फेब्रुवारीला अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र प्रभाग रचनेलाच मंजुरी न मिळाल्याने ही आरक्षण सोडत झालीच नाही. मात्र रद्द करण्यात आलेली सोडत पुन्हा कधी होणार याची निश्चित तारीख स्पष्ट केली नव्हती. निवडणूक आयोगाने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या प्रभाग रचनांची पडताळणी केल्यावर त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पुढची आरक्षण सोडतीची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. या प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर झाल्यावर त्या सोबत आरक्षण सोडत निश्चित होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आरक्षण सोडतीची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडण्यासोबत त्या सोडतीला येणाऱ्या हरकतींची सुनावणी घेण्यासाठीही निश्चित वेळ ठरविण्यात आली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १८ मार्च उजाडणार हे निश्चित मानले जात आहे. हरकती आणि त्यांच्यावरील सुनावणी याला वेळ मर्यादा असल्याने ही प्रक्रिया लांबणार आहे.
प्रचारासाठी वेळ मिळणार कमी
प्रभाग रचना निश्चित झाल्यावर लागलीच आचारसंहिताही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग निश्चिती आणि आचारसंहिता यांच्यातील अंतर कमी राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळणार आहे.यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.