`मजबुरी नाही तर मजबुती का नाम महात्मा गांधी!’ हे पटवून देणारे नाटक, ‘गांधी: अंतिम पर्व’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 05:00 PM2019-11-13T17:00:38+5:302019-11-13T17:03:32+5:30
‘गांधी: अंतिम पर्व’ मधून `मजबुरी नाही तर मजबुती का नाम महात्मा गांधी!’ हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
ठाणे : " गांधी अंतिम पर्व या गांधीजींवरील नाटकाच्या प्रभावी अभिवाचनाने तो काळ रत्नाकर मतकरी व त्यांच्या सह - कलाकारांनी डोळ्यासमोर जीवंत उभा केला. गांधीविचार आजच्या काळातही तितकेच लागू आहेत, हे ही यातून स्पष्ट झालं. आणि मुख्य म्हणजे, मजबुरी का नाही तर मजबुती का नाम है महात्मा गांधी, हे अधोरेखित झालं", अशा शब्दात प्रसिद्ध लेखिका प्रा. वृषाली विनायक यांनी गांधीजींवरील नाट्य वाचनाचा समारोप केला. समता विचार प्रसारक संस्था, विद्यादान सहायता मंडळ आणि जाग, ठाणे यांनी संयुक्त विद्यमाने ‘महात्मा गांधीजींच्या दिडशेव्या जयंती निमित्त’ आयोजित रत्नाकर मतकरी यांच्या ‘गांधी: अंतिम पर्व’ नाटकाचे स्वतः रत्नाकर मतकरी व सहका-यांच्या नाट्य अभिवाचनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
"सत्याचा, नीतीमत्तेचा, न्यायाचा, अहिंसेचा पुजारी - महात्मा गांधीजींना देशाच्या फाळणीला आणि त्यावेळी देशात झालेल्या हिंसेला जबाबदार धरण्यात आले. धर्म हा मानवासाठी निर्माण झाला आहे. पण धर्मांच्या कडवट अतिरेकाने मानवाचाच अंत होत आहे. अल्पसंख्यांकांचे रक्षण करणे हे देशाचे कर्तव्य आहे. अशी भूमिका मांडणा-या महात्मा गांधींविषयीच्या अनेक पथदर्शक आणि मानवतावादी विधानांनी ओतप्रोत भरलेल्या जेष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या, संपूर्णपणे सत्यावर आधारित नव्या कोर्या ‘गांधी: अंतिम पर्व’ या दोन अंकी नाटकाचे स्वतः रत्नाकर मतकरी यांनी केलेले अभिवाचन काल ठाण्यात संपन्न झाले. त्यांच्याबरोबर संजीव तांडेल, अपूर्वा परांजपे, रोहित मावळे, आदित्य कदम, दिप्ती दांडेकर आणि वंचितांच्या रंगमंचाचे अभिषेक साळवी आणि योगेश खांडेकर या त्यांच्या युवा साथीदारांनी अतिशय प्रभावी अभिवाचन सादर केले. गांधींनी दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये घालवलेल्या शेवटच्या काही दिवसात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी यावर हे नाटक रचलेले आहे. फाळणीनंतर झालेल्या हिंसाचाराने व्यथित होवून तो थांबवण्यासाठी प्राणांतिक उपोषण करणारे गांधीजी, त्यांना पाकिस्तानास अनुकूल आणि फाळणीस जबाबदार धरणार्या कट्टर हिंदू, मुस्लिम आणि शीख यांच्या रोषास प्राप्त झालेले गांधीजी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये फूट पडू नये म्हणून झटणारे गांधीजी, सामजिक ऐक्य, शांतता नसेल तर स्वातंत्र्य मिळूनही आपण गुलामगिरीतच आहोत असे मानणारे गांधीजी या अभिवाचनाच्या अप्रतिम सादरीकरणातून श्रोत्यांपुढे सजीव होवून आले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून खिळवून ठेवले.
अभिवाचनानंतरच्या चर्चेत अनेक नामवंत मान्यवर सहभागी
अभिवाचनानंतर झालेल्या चर्चेच्या वेळी सुप्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका हर्षदा बोरकर यांनी सांगितले की, ‘या स्तुत्य प्रयोगाने सर्वजण भारावून गेलेत. गांधीजींच्या विचारात आणि आचारात असलेली शांतता, बाहेर चालू असलेल्या हिंसाचाराच्या आणि गांधींविरूद्ध रचल्या जाणार्या कट कारस्थानाच्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर, ठळकपणे मनावर बिंबते. मतकरींनी आपल्या लेखणीतून आणि आवाजातून गांधी त्यांच्या शब्दांनी आमच्यापर्यंत पोहचवला. हे नुसतं अभिवाचन नसून गांधीजींना केलेले अभिवादन आहे!’ यावेळी नामवंत लेखक प्रा. प्रवीण दवणे म्हणाले,’ गांधी हा एक विचार आहे, आणि तो या अभिवाचनातून प्रखरपणे समोर येतो, त्यामुळे मनन चिंतन करण्यास प्रवुत्त करणार्या या प्रयोगाकडे वैचारिक स्वातंत्र्याची चळवळ म्हणून पहायला हवे. या उत्कृष्ट अभिवाचनात शब्द तर बोलतातच पण कोर्या जागाही बोलतात. मतकरींनी गांधीजींचं मन साध्या सरळ शब्दात अचूक मांडलं आहे,’ प्रसिद्ध नाट्य - चित्रसमीक्षक प्रा. संतोष पठारे यांनी या नाटक लिहिण्यामागची प्रेरणा काय आहे असे विचारता, मतकरी म्हणाले, महात्मा गांधी या व्यक्तिमत्वावर अतिशय प्रेम करणारे आहेत तसेच त्यांचा अतिशय द्वेष करणारे लोकही आहेत. लोकांमध्ये विशेषतः आजच्या तरुण पिढीमधील गांधीजींबद्दलचे गैरसमज दूर व्हावे आणि सत्य लोकांपुढे यावे हा हेतु हे नाटक लिहिण्यामागे आहे. प्रीती छत्रे, भारती पाटणकर, शिवाजी पवार आदींनीही चर्चेत भाग घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता विचार प्रसारक संस्था व जागचे जगदीश खैरालिया यांनी केले. ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेल्या या प्रयोगाला वंदना शिंदे, साहित्यिक सुनील कर्णिक, सतीश चाफेकर, ज्योती भारती, डॉ. गिरीश साळगावकर, अनूपकुमार प्रजापती, गीता शाह, जयंत कुलकर्णी, अतुल गोरे, सुभाष तंवर, महेंद्र मोने, माधवी जोग, स्नेहा शेडगे,शिवाजी पवार, शुभानन आजगावकर, अरविंद परूळेकर, सचीन वेलिंग आदि मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थांचे कार्यकर्ते सुनील दिवेकर, अजय भोसले, लतिका सु.मो., मनीषा जोशी, अनुजा लोहार, प्रवीण खैरालिया आदींनी विशेष मेहनत घेतली, असे समता विचार प्रसारक संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी सांगितले.