ब्रह्मदेवाने साकारला गांधींचा जीवनपट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:59 AM2018-06-11T03:59:07+5:302018-06-11T03:59:07+5:30
भार्इंदर - येथील स्थानिक व जागतिक स्तरावरील कुंभारकलेत पारंगत असलेले पद्मश्री पुरस्कारविजेते ब्रह्मदेव पंडित यांनी बिहारच्या पाटणा येथील गांधी सभागृहात सिरॅमिक म्युरलद्वारे गांधीजींचा जीवनपट साकारला.
- राजू काळे
भार्इंदर - येथील स्थानिक व जागतिक स्तरावरील कुंभारकलेत पारंगत असलेले पद्मश्री पुरस्कारविजेते ब्रह्मदेव पंडित यांनी बिहारच्या पाटणा येथील गांधी सभागृहात सिरॅमिक म्युरलद्वारे गांधीजींचा जीवनपट साकारला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांचा विशेष सत्कार करून तेथील सरकारी इमारतींत अशाच प्रकारच्या कलाकृती साकारण्याचे आमंत्रण दिले.
बिहारमध्ये सध्या चंपारण सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. त्याअनुषंगाने तेथील सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार २०१७ मध्ये मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आले असता त्यांची ब्रह्मदेव यांच्याशी भेट झाली. ब्रह्मदेव हे सुद्धा मूळचे बिहारमधील नवादा गया येथील रहिवासी असून त्यांचा जन्म कुंभार कुटुंबात झालेला आहे. पिढीजात कुंभार व्यवसायात नावीण्यपूर्ण कलाकृती साकारल्याने त्यांना १९७० मध्ये बिहारमधीलच लोकनेता जयप्रकाश नारायण आश्रमाद्वारे विशेष शिष्यवृत्ती देण्यात येऊन मुंबईच्या वांद्रे येथील कलानगर येथे पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले. तेव्हापासून त्यांनी कुंभार व्यवसायात वेगवेगळ्या आकर्षक कलाकृती साकारून त्या जागतिक स्तरावर पोहोचवल्या. त्यांच्या या कलाकृतींची दखल घेत त्यांना २०१५ मध्ये
भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले. त्यांच्या कलाकृती राष्टÑपती भवनातील म्युझियममध्येसुद्धा पाहावयास मिळतात. त्यांच्या या कलाकृतीमुळेच नितीशकुमार यांनी त्यांना बिहारमध्ये आमंत्रित करून पाटणामधील एका सरकारी इमारतीतील गांधी सभागृहात म्युरल साकारण्यास सांगितले. त्यानुसार, ब्रह्मदेव यांनी आपला मुलगा अभय यांच्या मदतीने सुमारे ८ ते ११ महिन्यांत गांधीजींचा जीवनपट सिरॅमिकच्या तीन म्युरलवर साकारला. त्यात गांधीजींनी आपल्या आयुष्यात वापरलेला चरखा, पेन, रेल्वेगाडीतील प्रवास, पादत्राणे अशा साहित्यांसह त्यांच्यावर प्रभाव पाडणारे विनोबा भावे, रवींद्रनाथ टागोर, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण या महापुरुषांच्या छबी व सत्याग्रहाच्या कलाकृती साकारल्या आहेत.
या कलाकृतींनी प्रभावित होऊन नितीशकुमार यांनी ब्रह्मदेव यांचा पाटणा येथील एका कार्यक्रमात विशेष सत्कार करून पुन्हा बिहारमध्ये सरकारी इमारतींत बिहारच्या संस्कृतीच्या कलाकृती साकारण्याचे निमंत्रण दिले आहे.
चंपारणमध्ये सत्याग्रह
ब्रिटिश राजवटीत बिहारमधील चंपारणमध्ये नीळ या द्रवपदार्थाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जात होते. त्यासाठी ब्रिटिश सरकार स्थानिक शेतकऱ्यांवर त्याच्या शेतीसाठी शेतकºयांवर जबरदस्ती करत होते. यामुळे सुपीक शेतजमीन नापीक होऊ लागल्याने ब्रिटिशांच्या या जाचाविरोधात गांधीजींनी चंपारणमध्ये सत्याग्रह सुरू केला. त्याअनुषंगाने नीळयुक्त हिरव्या रंगात म्युरल साकारल्याचे ब्रह्मदेव यांनी सांगितले.