वर्षातील अखेरच्या अंगारकीला टिटवाळ्यात भाविकांचा महापूर
By admin | Published: September 2, 2015 03:42 AM2015-09-02T03:42:00+5:302015-09-02T03:42:00+5:30
या वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी असल्याने टिटवाळ्याच्या गणेश मंदिरात बापाच्या दर्शनासाठी सोमवारी रात्री पासूनच भाविकांचा महापूर उसळला होता
टिटवाळा : या वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी असल्याने टिटवाळ्याच्या गणेश मंदिरात बापाच्या दर्शनासाठी सोमवारी रात्री पासूनच भाविकांचा महापूर उसळला होता. त्याना योग्य सेवा मिळून दर्शनाचा लाभ घेता यावा या करिता मंदिर विश्वस्तांकडून उत्तम व्यवस्था तर टिटवाळा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता.
रात्री बारा वाजता मंदिर विश्वस्त विनोद जोशी व सुभाष जोशी यांनी श्री ना अभिषेक केला. आरती करून मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले. तेंव्हापासून भाविकांची झुंबड उडाली होती. गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय. या घोषाणांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून निघाला होता होता.
यावेळी परिसरातून मोठ्या प्रमाणात पायी दिंड्या देखील गणेशाच्या दर्शनासाठी टिटवाळ्यात दाखल झाल्या होत्या. तसेच उल्हासनगर(कालीबाडी,कुर्ला कॅम्प ) ते टिटवाळा महागणपती पदयात्रा दृष्टी सामाजिक संघटना आणि श्री सार्इं सेवक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. सुमारे ८ किलोमीटरचे आंतर पायी चालत सुमारे २५० भाविक दाखल झाले होते. मुंबई, ठाणे सह लगतच्या कल्याण,डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर, मुरबाड, वासिंद या उपनगरातील भाविकांनी या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. स्थानिक नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी भाविकांसाठी मोफत खिचडी वाटप केली.
यावेळी मंदिर व्यवस्थापनानेसुरक्षा यंत्रणा सज्ज केली होती. तसेच
अनिरुद्ध बापू यांचे स्वयंसेवक सेवकदेखील आपल्या परीने सेवा करत होते. टिटवाळा पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता. तीन उपविभागीय अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, दोन सह. पो. नि. चार पो.उ.नि, वाहतूक शाखेचे २५ कर्मचारी, २० महिला कर्मचारी व इतर दिडशे कर्मचारी वर्गाचा बंदोबस्त ठेवला असल्याचे टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी सांगितले. (वार्ताहर)