महात्मा फुले चौक, कासारवडवली सर्वाेत्कृष्ट पोलीस ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:41 AM2021-05-13T04:41:25+5:302021-05-13T04:41:25+5:30
कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत पार पडलेल्या `उत्कृष्ट पोलीस ठाणे` स्पर्धेत कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाणे आणि ...
कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत पार पडलेल्या `उत्कृष्ट पोलीस ठाणे` स्पर्धेत कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाणे आणि ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाणे या दोन पोलीस ठाण्यांनी बाजी मारली आहे. आता पुढे राज्यस्तरावर पार पडणाऱ्या उत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कारासाठी त्यांची माहिती पाठविली जाणार आहे.
कायदा सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी, याकरिता देशपातळीवर १० सर्वाेत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्यात येते. याचाच एक भाग असलेल्या ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत उत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्याकरिता निवड समिती गठीत करण्यात आली. पोलीस सहआयुक्त डॉ. सुरेश मेकला हे समितीचे अध्यक्ष होते. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय ऐनपुरे आणि पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मीकांत पाटील हे सदस्य तथा समन्वय अधिकारी होते. ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडलीय पोलीस उपआयुक्त यांच्याकडून त्यांचे परिमंडलातील प्रत्येकी दोन उत्कृष्ट पोलीस ठाणे यांची माहिती निवड समितीकडे पत्रान्वये पाठविण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे यांनी श्रीनगर पोलीस ठाणे आणि कासारवडवली पोलीस ठाणे, तर अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण यांनी मानपाडा पोलीस ठाणे, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे, बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे अशा एकूण सहा पोलीस ठाण्यांची माहिती निवड समितीकडे पाठविली होती. समितीने पोलीस ठाण्यांच्या गुणांकन आणि निकषांवर ठाणे पोलीस आयुक्तालयातील कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाणे आणि ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाणे या दोन पोलीस ठाण्यांची सर्वाेत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड केली. लवकरच या दोन्ही पोलीस ठाण्यांना फिरते चषक आणि २५ हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड करण्यात आली, त्याचे श्रेय आमच्या पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना द्यायला हवे. कोरोना काळातही त्यांनी अहोरात्र काम केले, त्याचे हे फलित आहे, अशी प्रतिक्रिया महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांनी दिली.
------------------------------------------------------
वाचली