जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:54 AM2021-03-01T00:54:47+5:302021-03-01T00:54:47+5:30
निवडणुकीची जबाबदारी आर.सी. पाटील आणि गोपाळ लांडगे यांच्याकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (टीडीसीसी) निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिली. या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक ठाण्यात झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
३० मार्च रोजी टीडीसीसी बँकेसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी ठाण्याच्या एका हॉटेलमध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये पालकमंत्री शिंदे, गृहनिर्माणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ठाणे- पालघर जिल्ह्याचे प्रभारी राजेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या निवडणुकीची जबाबदारी आर.सी. पाटील आणि गोपाळ लांडगे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली.
शिंदे यावेळी म्हणाले की, याआधी ही निवडणूक कधी गांभीर्याने घेतली नव्हती. मात्र, आता महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढविणार आहे. उमेदवार निवडीपासून महाविकास आघाडी एकत्रित काम करणार असून, ही निवडणूक आम्हाला अवघड नाही. आव्हाड यावेळी म्हणाले की, टीडीसीची निवडणूक लढवून आपल्या विचारांची एक संस्था ताब्यात घेऊन त्याद्वारे रोजगारनिर्मिती करण्याचा आपला उद्देश आहे. त्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. कार्यकर्त्यांनी एकत्र यायचे ठरविले, तर त्यासाठी मेहनत करायला आम्ही तिन्ही पक्षांचे नेते सज्ज आहोत. सध्या ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक नगरसेवक आहेत.
nपत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, ही सहकाराची निवडणूक आहे. सहकार अडचणीत आल्यावर सरकारने मदत करायची असते. गेली अनेक वर्षे आम्ही हेच करीत आलेलो आहोत. म्हणून सहकार क्षेत्र जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र निवडणूक लढविणार आहोत. त्यामध्ये कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. ही पहिलीच आढावा बैठक आहे. लवकरच जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
nयावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ठाणे पालघर प्रभारी राजेश शर्मा, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे- पालघर समन्वयक आनंद परांजपे, महापौर नरेश म्हस्के, ठाणे शहर काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हणमंत जगदाळे, टीडीसीसीचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील आदी उपस्थित होते.
nटीडीसीसी बँकेच्या २१ जागांसाठी येत्या ३० मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी २६ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान अर्ज वाटप आणि अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ५ मार्च रोजी छाननी होईल. २१ मार्च रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. ३० मार्च रोजी मतदान आणि ३१ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.