"अंगावर आलेले केंद्राच्या माथी मारण्याची महाविकास आघाडीची भूमिका"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 11:57 PM2020-12-15T23:57:06+5:302020-12-15T23:57:22+5:30
सत्ताधाऱ्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा चुकीचा
ठाणे : महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी, एखादा मुद्दा अंगावर आल्यास तो केंद्र सरकारच्या माथी मारण्याची भूमिका त्यांच्याकडून घेतली जात असल्याची उपरोधिक टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. त्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दिल्लीत शेतकऱ्यांच्या नावाखाली जे आंदोलन सुरू आहे ते मुळात त्यांच्याविरोधात असून राज्यातील सत्ताधारी याला पाठिंबा देतात हे दुर्दैवी आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना भाज्या, फळे यांची थेट विक्री करता येत होती. शेतकऱ्यांचा फायदा होत होता. ग्राहकांना रास्त भावात शेतीमाल मिळत होता. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची दलालांच्या कचाट्यातून मुक्तता होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार या विधेयकाला विरोध करीत आहे. पण मुळात हे सरकार सत्तेवर येताच त्यांनी एपीएमसीतील शेतकऱ्यांच्या मतदानाचा हक्क हिरावला. या विधेयकातील आक्षेपाच्या मुद्द्यावर चर्चा करणे गरजेचे असताना, ते रद्द करा ही भूमिका काहींची आहे. एपीएमसीत आज शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या विधेयकाने शेतकऱ्यांचे शोषण थांबेल, असे ते म्हणाले.
या वेळी भाजपचे राज्य सचिव संदीप लेले, विलास साठे आणि मनोहर सुगदरे उपस्थित होते.