महावितरणचं काम, मीटरसाठी ११ महिने थांब; ठाणेकरांना होतोय नाहक त्रास
By अजित मांडके | Published: March 26, 2024 03:44 PM2024-03-26T15:44:33+5:302024-03-26T15:44:47+5:30
महावितरणच्या भोगंळ कारभाराचा ठाणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ठाणे : महावितरणच्या भोगंळ कारभाराचा ठाणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन मीटर लावण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करुनही महावितरणकडे मीटर नसल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे महावितरणकडे मीटर नसतांना खाजगी दुकानदाराकडे मात्र मीटर असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे ग्राहकांना खिशाला कात्री मारुन हे मीटर विकत घ्यावे लागत आहेत. परंतु जे ग्राहक थांबतात, त्यांना नवीन मीटरसाठी तब्बल ११ महिन्याहून अधिकचा कालावधी जात असल्याचे दिसत आहे.
महावितरणकडून येणाऱ्या वाढीव बिलामुळे आधीच ठाणेकर ग्राहक हैराण झाले आहेत. त्यात आता नवीन मीटरसाठी सहा सहा महिने थांबावे लागत असल्यानेही त्याचा नाहक भुर्दंड ठाण्यातील ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ठाण्यातील असंख्य ग्राहकांना महावितरणच्या या गलथान कारभाराचा फटका बसला आहे. काहींचे मीटर मागील काही महिन्यापासून बंद आहेत, ते मीटर बदलून मिळावे यासाठी ते वारंवार महावितरणच्या कार्यालयाचे खेटे घालत आहेत. परंतु त्यांना नवीन मीटर बसवून मिळत नाही. या उलट फॉल्टी मीटर दाखवून त्यांना सरासरी वाढीव बिल महावितरणकडून दिले जात आहे. ते कमी करण्यासाठी पुन्हा महावितरणच्या खेटा घालाव्या लागत आहेत. त्यासाठी कामाचे खाडे करावे लागत आहेत. परंतु महावितरणकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत.
त्यात एखाद्या ग्राहकाने मीटरसाठी तगादा लावलाच तर त्याला ठाण्यातील एका खाजगी दुकादाराचा पत्ता दिला जात असून त्याच्याकडून मीटर घ्या असे सांगितले जात आहे. परंतु त्याचा नाहक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणकडे मीटर नसतांना खाजगी दुकानदाराकडे मीटर कसे असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यातही तुमच्याकडे मीटर नाही का? असे विचारल्यास वरीष्ठ पातळीवरुनच आम्हाला मीटर प्राप्त होत नसल्याचे उत्तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहे.
त्यामुळे बहुसंख्य ग्राहकांना सहा महिने ते ११ महिन्यापासून नवीन मीटरच उपलब्ध होऊ शकले नसल्याची बाब दिसून आली आहे. दुसरीकडे आता नव्याने डीजीटल मीटरचे स्वप्न ग्राहकांना दाखविले जात आहे. ते मीटर आल्यावरच तुम्हाला मीटर बदलून मिळतील असेही सांगितले जात आहे. त्यामुळे महावितरणाचा कारभार, मीटरसाठी ११ महिने थांब अशीच म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.