महावितरणच्या कर्मचाऱ्याला ग्राहकाची मारहाण; नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Published: October 5, 2023 10:38 PM2023-10-05T22:38:15+5:302023-10-05T22:38:31+5:30
कारवाईची मागणी
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दोन महिन्यांचे वीजबिल थकविणाऱ्या ग्राहकाला ते भरण्याचे आवाहन करणाऱ्या महेंद्र बडगुजर (४०) या वरिष्ठ तंत्रज्ञालाच सौरभ लेले या ग्राहकाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेने वीज कर्मचारी आक्रमक झाले असून संबंधित ग्राहकावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तसेच गुरुवारी सायंकाळी काही काळ काम बंद आंदाेलनही करीत या घटनेचा निषेध नाेंदविला.
वीज वितरण कंपनी वर्कर्स फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य संयुक्त सचिव निलेश्वर बनसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार नौपाड्यातील विष्णूनगर भागातील जोग टॉवरमधील रहिवासी लेले यांच्या वीजबिलाची ६५ दिवसांची सहा हजार ९१५ इतकी थकबाकी आहे. ती तातडीने भरावी, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल, अशी सूचना देण्यासाठी बडगुजर हे लेले यांच्या घरी गुरुवारी दुपारी गेले होते. यातूनच झालेल्या बाचाबाचीतून लेले यांनी बडगुजर यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करीत जबर मारहाण केली.
या घटनेने संतप्त झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नौपाडा पोलिस ठाण्यात लेले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर कडक कारवाईची तसेच अटकेचीही मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ काही काळ काम बंद आंदोलनही केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन याेग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.