आघाडी, महायुतीला बंडखोरांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:22 AM2019-04-10T00:22:31+5:302019-04-10T00:24:56+5:30
भिवंडी लोकसभा : विश्वनाथ पाटील, बाळ्यामामांची अपक्ष उमेदवारी, वंचित बहुजन आघाडीही रिंगणात
- मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बाळ्यामामा आणि काँग्रेस पक्षाचे विश्वनाथ पाटील यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आघाडीचे सुरेश टावरे व महायुतीचे कपिल पाटील यांच्यापुढे या बंडखोरांचे आव्हान राहणार आहे. भिवंडी मतदारसंघात आगरी-कुणबी मतांचे विभाजन होणार असून, महायुती व आघाडीच्या विजयाची वाट हे बंडखोर अडवू शकतात. याशिवाय, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही रिंगणात असून, कुणीच माघार न घेतल्यास भिवंडी मतदारसंघात पंचरंगी निवडणूक रंगण्याची शक्यता आहे.
महायुतीचे उमेदवार, विद्यमान भाजप खासदार कपिल पाटील यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना महायुतीकडून उमेदवारी निश्चित होती; मात्र शिवसेनेचे बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांनी शिवसेनेत असतानाच काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले. काँग्रेसचे सुरेश टावरे यांची जाहीर झालेली उमेदवारी, शेवटच्या क्षणापर्यंत ए, बी फॉर्मचा रखडलेला प्रश्न आणि बाळ्यामामाचे सुरू असलेले प्रयत्न पाहता, टावरे यांच्या उमेदवारीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम कायम होता. अखेर, टावरे यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या कार्यालयातून टावरे जवळपास १५० कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते आरिफ खान, माजी पालकमंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे जावेद दळवी, खालिद गुड्डू आदी उपस्थित होते. टावरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने बाळ्यामामाचा पत्ता कट झाला असल्याची चर्चा रंगली असतानाच, दुपारी २ वाजता ते अर्ज भरण्यासाठी हजर झाले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यावेळी बाळ्यामामांनी शक्तिप्रदर्शन केले नाही. त्यांच्यासोबत मोजकेच २५ कार्यकर्ते होते. टावरेंनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विश्वनाथ पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांच्यासोबत कुणबीसेनेचे कार्यकर्ते होते. त्यांनी प्रवेशद्वाराच्या बाहेर घोषणाबाजी केली. पाटील व बाळ्यामामांची बंडखोरी महायुती व आघाडीसाठीही डोकेदुखीची ठरणार आहे.
काँग्रेसने खरोखरच बनवले ‘मामा’
महायुतीने कपिल पाटील यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेकडून बाळ्यामामांना उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्टच होते; मात्र त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांना भाजपाची फूस होती, असे सांगण्यात येत असले, तरी भाजप मामांना फूस लावून आपल्याच पायावर धोंडा कशाला मारून घेईल, हा प्रश्नच आहे. मामांना काँग्रेसचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत होती; मात्र काँग्रेसने शेवटपर्यंत झुलवून बाळ्यामामांना खरोखरच मामा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.