महायुतीच्या शक्तिप्रदर्शनाने शहरात वाहतूककोंडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:41 PM2019-04-09T23:41:27+5:302019-04-10T00:38:37+5:30
आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांनी सोमवारी अर्ज दाखल केला, तेव्हाही आघाडीकडून शक्तिप्रदर्शन झाले.
डोंबिवली : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कल्याण लोकसभा मतदारसंघात २२ उमेदवारांनी अर्ज भरल्याने या मतदारसंघात आता ३६ उमेदवार आहेत. महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
महायुतीने केलेल्या जोरदार शक्तिप्रदर्शनाचा फटका वाहतुकीला बसला. सर्वसामान्यांना त्यामुळे नाहक त्रास झाला. गर्दीमुळे उमेदवारी अर्जाचा मुहूर्त चुकू नये, यासाठी अखेर श्रीकांत शिंदे यांनाही रॅली सोडून दुचाकीने निवडणूक कार्यालय गाठावे लागले.
आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांनी सोमवारी अर्ज दाखल केला, तेव्हाही आघाडीकडून शक्तिप्रदर्शन झाले. त्यावेळी झालेल्या वाहतूककोंडीत ‘मतदार’ वेठीला धरले गेल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी याचीच पुनरावृत्ती घडली. श्रीकांत शिंदे यांचा अर्ज दाखल करताना सेनेसह भाजपा, रिपाइं, श्रमजीवी संघटना आणि रासप या महायुतीच्या घटक पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या मिरवणूक रॅलीत महिलांचे लेझीम पथक, ढोलताशांचे पथक, आदिवासीबांधवांचे तारपा नृत्य आणि विकास योजना, पर्यावरण संदेश देणारे चित्ररथ यांचा समावेश होता. ठाण्यापासून ते बदलापूर, भिवंडी तसेच आसपासच्या भागातून महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीने आधीच कोंडी झाली असताना, नेत्यांच्या ताफ्यांनी यात भर पडली. नेत्यांच्या वाहनांसह कार्यकर्त्यांच्या बसगाड्यांनी श्री गणेश मंदिर परिसरातील लहान गल्ल्याही व्यापल्याने या परिसरात चोहोबाजूंनी वाहतूककोंडी झाली.
शिंदे यांनी श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला प्रारंभ केला. अप्पा दातार चौक, फडके मार्ग, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, मानपाडा चाररस्ता, कल्याण रोड, घरडा सर्कल आणि क्रीडासंकुल अशी रॅली काढण्यात आली. कोंडीमुळे बहुतांश वेळ वाहने एकाच जागी थांबून राहिली. त्यामुळे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्य रस्ता सोडून अंतर्गत रस्त्यांनी क्रीडासंकुल गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अंतर्गत रस्तेही जॅम झाले.
दुचाकीने गाठले कार्यालय
श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज भरण्यासाठी दुपारी १२.३३ चा मुहूर्त काढण्यात आला होता; मात्र ९ वाजता प्रारंभ होणारी रॅली साडेअकराच्या आसपास सुरू झाली. त्यात वाहतूककोंडीमुळे मुहूर्त चुकत असल्याचे पाहून शिंदे यांनी रॅलीमधील रथ सोडून दुचाकीने निवडणूक कार्यालय गाठले. दुचाकीवर त्यांचे सारथ्य भाजपचे कल्याण लोकसभा विस्तारक शशिकांत कांबळे यांनी केले. हे दृश्य पाहून आता खऱ्या अर्थाने युती झाल्याची टिप्पणी काहींच्या तोंडून आपसूकच निघाली. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या अन्य उमेदवारांनाही या कोंडीचा त्रास झाला.
दिग्गजांची उपस्थिती
रॅलीत शिवसेना, भाजपा, रिपाइं आदींच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, आमदार रवींद्र फाटक, सुभाष भोईर, किसन कथोरे, डॉ. बालाजी किणीकर, गणपत गायकवाड, शांताराम मोरे, रूपेश म्हात्रे, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, रिपाइंचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव आदी यावेळी उपस्थित होते.