बॅनरवरून शिवसैनिकांचा मेळाव्यावर बहिष्कार, राडा झाल्याने महायुतीचा मेळावा अखेर रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:44 AM2019-04-16T00:44:08+5:302019-04-16T00:44:34+5:30
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अंबाडी येथे महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात रविवारी मानापमान नाट्य चांगलेच रंगले.
- विनोद पाटील
अंबाडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अंबाडी येथे महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात रविवारी मानापमान नाट्य चांगलेच रंगले. व्यासपीठाच्या बॅनरवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचा फोटो नसल्याचे पाहून मेळाव्याच्या सुरुवातीलाच शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी मेळाव्यावर बहिष्कारही टाकला. हा वाद एवढा वाढला की, अखेरीस भाजपला मेळावा रद्द करावा लागला.
अंबाडीजवळील यशश्री फार्महाउसवर रविवारी सायंकाळी ६ वाजता अंबाडी, दाभाड आणि गणेशपुरी जिल्हा परिषद गटातील शिवसेना, भाजप, कुणबीसेना, श्रमजीवी संघटना तसेच रिपाइं कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार खा. कपिल पाटील यांच्यासह शिवसेनेचे ठाणे (ग्रामीण) जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, रिपाइं जिल्हाध्यक्ष बाळाराम गायकवाड, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर आणि महायुतीचे भिवंडी तालुक्यातील प्रमुख नेते मार्गदर्शन करणार होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांसह स्थानिक नेतेमंडळी कार्यक्रमस्थळी हजर झाली. त्यावेळी एका शिवसैनिकाचे लक्ष व्यासपीठावरील बॅनरवर गेले. त्यावर प्रकाश पाटील व आमदार शांताराम मोरे यांचे फोटो नसल्याची बाब त्याने शिवसेना उपतालुकाप्रमुख किशोर जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. आपल्या नेत्यांना भाजप उमेदवार दुय्यम वागणूक देतात, असा आरोप करून जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी नारेबाजी सुरू केली. आमच्या नेत्यांचा जाणूनबुजून अपमान केल्याचा आरोप करून, शिवसैनिकांनी या मेळाव्यावर बहिष्कार घालण्याची भाषा सुरू केली. अखेर, भाजप कार्यकर्त्यांनी वाद वाढू नये, म्हणून बॅनर व्यासपीठावरून काढून टाकले. तरीही, शिवसैनिकांचे समाधान झाले नाही. शिवसेना भिवंडी तालुकाप्रमुख विश्वास थळे यांनी या वादावर पडदा टाकून शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही न जुमानता शिवसैनिकांनी हा मुद्दा उचलून धरला. कार्यक्रमावर बहिष्काराचा निर्धार करून सर्व शिवसैनिक कार्यक्रमस्थळाहून निघून गेले.
>गाड्या गेल्या माघारी
मेळाव्यावर बहिष्कार टाकून सर्व शिवसैनिक अंबाडीनाक्यावर जिल्हाप्रमुखांच्या गाडीची वाट पाहत थांबले.
काही वेळातच जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व आमदार शांताराम मोरे यांच्या गाड्या तिथे पोहोचल्या. प्रकाश पाटील आणि आ. मोरे आल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून, त्यांना मेळाव्यास न जाण्यास सांगितले. शिवसैनिकांचे रौद्र रूप बघून त्यांनी अंबाडीनाक्यावरूनच आपल्या गाड्या माघारी फिरवल्या. खा. कपिल पाटील यांना ही बाब समजताच त्यांनी मेळावा रद्द करण्याची सूचना भाजपच्या कार्यकर्त्यांना केली. त्यामुळे मेळावा अखेर रद्द करण्यात आला.