भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी महायुतीचे सचिन पाटील तर उपसभापती पदी मनेष म्हात्रे विजयी
By नितीन पंडित | Published: May 15, 2023 06:24 PM2023-05-15T18:24:54+5:302023-05-15T18:25:01+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.
भिवंडी: भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीने बाजी मारली असून सभापती पदी भाजपचे सचिन पाटील तर उपसभापती पदी शिवसेनेचे मनेष म्हात्रे हे विजयी झाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.यावेळी सभापती पदाच्या निवडीसाठी महायुतीच्या वतीने भाजपचे सचिन बाळाराम पाटील यांनी अर्ज दाखल केला होता तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचे महेंद्र पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.यावेळी सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सचिन पाटील यांना नऊ तर महेंद्र पाटील यांना आठ मते मिळाली असून एक मत बाद झाला आहे.
अवघ्या एका मताने सचिन पाटील यांचा विजयी झाला तर उपसभापती निवडणुकीत शिवसेनेचे मनेष म्हात्रे यांना दहा तर महाविकास आघाडीचे संजय पाटील यांना आठ मते मिळाली. त्यानंतर या निवडणुकीचे प्राधिकृत अधिकारी बाळा परब यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर करीत सचिन पाटील व मनेष म्हात्रे यांच्या विजयाची घोषणा केली. या विजया नंतर भाजपा शिवसेना संचालक व पक्ष पदाधिकारी यांनी एकच जल्लोष केला .त्यानंतर नवनिर्वाचित सभापती उपसभापती व संचालकांनी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील आणि श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांच्या यशस्वी रणनीतीतून भिवंडी बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला आहे.शेतकरी वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न महायुती च्या माध्यमातून केला जाईल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सभापती सचिन पाटील यांनी दिली.तर भिवंडी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीत नवनवीन प्रयोगासाठी व दुग्धपालनासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच कृषीमालाला मुंबई-ठाण्यात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नवनिर्वाचित सभासदांना केली आहे.