उल्हासनगरमध्ये महेक इमारत कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:19 PM2019-08-13T12:19:10+5:302019-08-13T12:21:20+5:30
उल्हासनगरमधील महेक इमारत मंगळवारी कोसळल्याची घटना समोर आली आहे. खचलेल्या महेक इमारतीमधून सोमवारी 31 कुटुंबाना बाहेर काढण्यात आले होते.
सदानंद नाईक
उल्हासनगर - उल्हासनगरमधील महेक इमारत मंगळवारी (13 ऑगस्ट) कोसळल्याची घटना समोर आली आहे. खचलेल्या महेक इमारतीमधून सोमवारी 31 कुटुंबाना बाहेर काढण्यात आले होते. ही इमारत सीलबंद केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता इमारत कोसळल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणत प्लॉटधारकांनी परमेश्वरांसह पालिका अधिकाऱ्याचे आभार मानले आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं -3 लिंक रोड येथील पाच मजली महेक इमारतीमधील घरांचे सोमवारी (12 ऑगस्ट) सकाळी 8 वाजता दरवाजे उघडत नव्हते. या प्रकारामुळे घाबरलेल्या लोकांनी महापालिका अग्निशमन दलाच्या कार्यालयात फोन करून याबाबत माहिती दिली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी सर्वांचे दरवाजे उघडून लोकांना इमारती बाहेर सुरक्षितरित्या बाहेर काढले. यावेळी इमारत एका बाजूने झुकल्याचे उघड झाले होते.
पालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी, सहायक आयुक्त भगवान कुमावत यांच्यासह स्थानिक नेते व नगरसेवकांनी गर्दी केली होती. वास्तुविशारद लक्ष्मण कटारिया यांच्यासह इतर तज्ज्ञांनी इमारतीची पाहणी करून एका महिन्यात अहवाल देणार असल्याचे सांगितले होतं. त्यापैकी अनेकांनी इमारतीला धोका नसून लोकांना राहू देण्यास हरकत नसल्याचे सांगितले. तसेच स्थानिक बहुतांश नेत्यांनी तशीच भूमिका घेतल्याने पालिका अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला होता.
महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सविस्तर माहिती घेऊन, इमारतीचा अहवाल येई पर्यंत इमारत सीलबंद करण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यांनी इतरांची मागणी न ऐकता इमारत सीलबंद करून इमारतीमध्ये जाण्यास लोकांना मज्जाव केला होता. महापालिका आयुक्त देशमुख व सहाय्यक आयुक्त कुमावत यांचा निर्णय आज अखेर योग्य ठरून 31 कुटुंबांचा जीव वाचला आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता पाच मजल्याची इमारत कोसळली असून तब्बल 31 कुटुंब बेघर झाली आहेत. कोसळलेल्या इमारतीकडे लोकांनी सकाळी धाव घेतल्यावर परमेश्वर व पालिकेचे आभार मानले आहेत.