महेश आहेर मारहाण प्रकरण: चौघांना न्यायालयीन कोठडी
By जितेंद्र कालेकर | Published: February 20, 2023 10:08 PM2023-02-20T22:08:21+5:302023-02-20T22:08:44+5:30
चौघांकडेही आणखी चौकशी करण्यासाठी नौपाडा पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत वाणी, अभिजित पवार, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड यांची ठाणे न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. चौघांकडेही आणखी चौकशी करण्यासाठी नौपाडा पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना संपविण्यासाठी तिहार जेलमधील गँगस्टर बाबाजी ऊर्फ सुभाषसिंह ठाकूर याच्या मदतीने शार्प शूटरला सुपारी दिल्याचे संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप १५ फेब्रुवारीला व्हायरल झाली होती. त्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या हेमंत वाणीसह इतरांनी ठाणे महापालिकेच्या आवारातच आहेर यांच्यावर हल्ला केला होता.
नौपाडा पोलिसांनी यातील चौघांना अटक केली होती. या प्रकरणात त्यांना सुरुवातीला एक दिवस, त्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती. चौघांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"