महेश आहेर यांची अखेर उचलबांगडी, ठाणे पालिका आयुक्तांकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 10:43 AM2023-04-02T10:43:57+5:302023-04-02T10:44:11+5:30
किशोर कदम यांची नेमणूक, आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेले ठाणे महानगर पालिकेचे स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांचे या विभागात परतीचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी त्याच्या जागी किशोर कदम यांची नेमणूक आहे. त्यामुळे ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची चर्चा सध्या ठाण्यात रंगली आहे.
आहेर यांच्याविरोधात शहर काँग्रेसने भ्रष्टाचाराची मालिका जाहीर करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. हे प्रकरण नुकत्याच झालेल्या अधिवेशनातही खूप गाजले होते. विधानसभेत विविध सदस्यांनी आहेर यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ठाण्यातील काँग्रेसने वारंवार हा विषय उचलत यावर लक्ष वेधले होते. अखेर शुक्रवारी ठाणे महापालिकेकडून आहेर यांची या विभागातून उचलबांगडी केली. त्यांच्या जागी किशोर कदम व उपकार्यालय अधीक्षकपदी अजिनाथ आव्हाड याची नेमणूक केली आहे.
आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत
विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, गेले काही महिने आम्ही आहेर याच्यावर पुराव्यानिशी आरोप करीत असतानाही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत होता, परंतु आम्हीही सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केल्यामुळेच ठामपा प्रशासनाला वरील निर्णय घ्यायला भाग पडले आहे. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.